मुंबई- मुंबई महापालिकेत दीड दशकाहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, पालिकेतील कर्मचा-यांचे नेतृत्त्व करणा-या शिवसेनाप्रणीत म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या सभासदांची संख्या १८ हजारांवरून नऊ हजारांपर्यंत आली आहे. महापालिकेतील शिवसेनेच्या नेत्यांच्या दुर्लक्षामुळे कामगार संघटनेला ही उतरती कळा लागल्याची चर्चा पालिकेत रंगू लागली आहे.
महापालिकेत सुमारे एक लाख १८ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. महापालिकेत शिवसेनेची म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना, शरद राव यांची म्युनिसिपल मजदूर युनियन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युनियन आणि प्रकाश देवदास यांची म्युनिसिपल कर्मचारी महासंघ अशा विविध कामगार संघटना आहेत. परंतु, कोणत्याच कामगार संघटनांमुळे काहीच फायदा होत नाही. या उलट सभासद झाल्यामुळे कामगार संघटनेला देणगी रूपात लाभ हात आहे, असा आरोप कर्मचा-यांकडून होत आहे.
१९९६-९७ मध्ये नंदू साटम म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष असताना सुमारे १८ हजारांहून अधिक सभासद होते. मात्र गेल्या काही वर्षात ही संख्या नऊ हजारांपर्यंत घसरली आहे. त्या वेळी राव यांच्या संघटनेचे सुमारे ७० हजार सभासद होते. आज त्यात १० हजारांची वाढ झाली असून, एकूण ८० हजार सभासद आहेत. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटना आणि प्रकाश देवदास यांच्या संघटनेचे प्रत्येकी तीन हजार सभासद आहेत. एकूणच महापालिकेत शिवसेनेची सत्ता असतानाही त्यांच्याच संघटनेच्या सभासदांची संख्या घसरत असून, राव यांचे वर्चस्व मात्र वाढताना दिसत आहे.
कामगारांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी कामगार संघटनेचे अध्यक्ष अथवा पदाधिकारी प्रशासनाकडे गेल्यास त्यांना योग्य तो प्रतिसाद दिला जात नाही. महापौर, पालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृह नेते यांनी हस्तक्षेप करून कर्मचा-यांचे प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. परंतु, सध्या शिवसेना कामगार संघटनेच्या सभासदांकडे या नेत्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे सभासदांची संख्या घसरत आहे, असा आरोप माजी महापौर नंदू साटम यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment