मुंबई : आस्थापना खर्चातही सततची वाढ असल्याने बेस्ट आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे बेस्ट कायम तोट्यात सुरू आहे. हा तोटा टाळण्यासाठी बेस्ट प्रशासन आता कामांच्या तासांचे नियोजन करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करणार आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाला वार्षिक ३२ कोटी रुपयांचा फायदा होणार आहे.
बेस्ट उपक्रमातील मनुष्यबळाचा वापर आणि बसफेर्यांचा अभ्यास करण्यासाठी बेस्टने दोन सल्लागार संस्था नेमल्या आहेत. ट्रेपिझ या परदेशी संस्थेने तयार केलेल्या सॉफ्टवेअरच्या मदतीने वडाळा आणि ओशिवरा या दोन आगारांमध्ये १ जुलैपासून हा प्रयोग होणार आहे. या संस्थेने तयार केलेल्या वेळापत्रकानुसार या आगारांचे कामकाज सहा महिने चालणार आहे. बसमार्गांचे नियोजन, बसफेर्या, बसचालकांच्या ड्युटी आणि बसगाड्यांच्या देखभालीतून बचतीचा मार्ग सुचवणार आहे. याबाबत माहिती देताना महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी सांगितले की, आठ तासांची ड्युटी बंधनकारक असली तरी ड्युटी सहा तासांची लावण्यात येते. त्यामुळे कर्मचार्यांचे दोन तास फुकट जातात. नवीन वेळापत्रकामुळे हा वेळ आणि पैसाही वाचेल. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास संपूर्ण २५ आगारांमध्ये टप्प्याटप्प्याने हीच पद्धत अवलंबण्यात येणार आहे. यामुळे एप्रिल २0१४ ते मार्च २0१७ या कालावधीत बेस्टमध्ये १00 कोटींची बचत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment