मुंबई - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाने गेल्या 27 वर्षांत राज्यातील अनेक लाभार्थींना 313 कोटींचे कर्जवाटप केले. मात्र त्यातील तब्बल 80 टक्के कर्जाचे लाभार्थी बोगस आहेत, असा गौप्यस्फोट महामंडळाचे अध्यक्ष रमेश कदम यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. विशेष म्हणजे बोगस लाभार्थींचे सर्वाधिक प्रमाण औरंगाबादेत असल्याचे त्यांनी सांगितले.
मातंग समाजातील तरुणांना व्यवसाय आणि शिक्षणासाठी अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या वतीने कर्ज देण्यात येते. बोरिवली येथे महामंडळाचे मुख्य कार्यालय असून संतोष इंगळे हे त्याचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. या महामंडळाला अर्थसंकल्पात चालू आर्थिक वर्षासाठी राज्य सरकारच्या वतीने 75 कोटींचा निधी देण्यात आला आहे. मात्र या महामंडळाच्या माध्यमातून अनेक तरुणांनी व्यवसायाच्या नावावर घेतलेले कर्ज परतच केले नसल्याचा आजवरचा अनुभव आहे. काही राजकीय नेत्यांच्या शिफारशींनी हे कर्जवाटप झाले असून, व्होट बॅँक कायम राखण्यासाठी या महामंडळाद्वारे कर्जाची खिरापत वाटली जात असल्याचाही अनुभव आहे.
चौकशीसाठी विशेष पथक
मागील 27 वर्षात या महामंडळाने 313 कोटींचे कर्ज वाटप केले. त्यामध्ये 80 टक्के कर्जवाटप बोगस दस्तऐवजांच्या आधारे झाले आहे. अशा कर्जवाटप प्रकरणांची चौकशी करण्यासाठी महामंडळाने खास पथक नेमल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष रमेश कदम यांनी दिली.
कर्जवसुली 2 टक्के
50 वर्षे वयाच्या आतील कोणाही मातंग व्यक्तीला महामंडळाकडून कर्ज देण्यात येते. मात्र अपात्र लाभार्थींचे प्रमाण अधिक असल्यामुळे कर्जवसुली ठप्प झाली आहे. त्यामुळेच महामंडळाच्या कर्जवसुलीचे प्रमाण केवळ 2 टक्के असल्याचा आरोप महामंडळाच्या अध्यक्षांनी केला आहे.
सर्वाधिक बोगस प्रकरणे औरंगाबादची
कर्जवाटपातील सर्वाधिक बोगस प्रकरणे औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. संशयित 594 प्रकरणांतील कागदपत्रांची फेरपडताळणी करण्यात येत असून दोषी अधिकाºयांवर कारवाई करण्यात येईल, असे कदम यांनी सांगितले. कर्जवाटपप्रकरणी मंडळाच्या अध्यक्षाचा काहीच सहभाग नसतो. सर्व प्रक्रिया अधिकारी करतात. त्यामुळे बोगस कर्जवाटप झाले असल्यास त्याची जरुर चौकशी करावी, अशी प्रतिक्रिया या महामंडळाचे संस्थापक-माजी अध्यक्ष बाबासाहेब गोपले यांनी दिली.
No comments:
Post a Comment