शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जो पर्यंत होते तो पर्यंत शिवसैनिकांकडून कोणतेही चुकीचे निर्णय घेतले जात नव्हते. कारण बाळासाहेब स्वता दखल घेवून संबंधीत शिवसैनिक मग तो पदाधिकारी असो, सामान्य शिवसैनिक असो त्याची खरडपट्टी काढत असत. यामुळे बाळासाहेबांबद्दल शिवसेनेत तसेच इतर पक्षांमध्येही त्यांचा दरारा होता. परंतु बाळासाहेबांच्या मृत्य नंतर पदाधिकारी असलेल्या शिवसैनिकांनी सेनेची नाचक्की करून घ्यायची सुपारी घेतली आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बाळासाहेबांच्या मृत्यू नंतर बाळासाहेबांचे अंत्यसंस्कार झालेल्या जागेवरच बाळासाहेबांचे स्मारक उभारणार असे मनोहर जोशी यांनी लगेच अंत्यसंस्काराच्या दुसऱ्या दिवशी जाहीर करून टाकले. बाळासाहेबांचे अंत्यसंस्कार केलेली जागा ही उद्यानासाठी राखीव भूखंड आहे यावर कोणतेही बांधकाम करता येत नाही हे मुख्यमंत्री, खासदार, लोकसभेचे अध्यक्ष अशी पदे उपभोगलेल्या जोशी यांना माहित नव्हते का? मनोहर जोशींना हे जरी माहित असले तरी जोशी हे सेनेच्या राजकारणातून बाहेर फेकले जात होते, त्यांच्याकडे सेनेचे दुर्लक्ष होत होते म्हणून अशी मागणी केल्यास आपल्याला शिवसैनिकांचा पाठींबा मिळेल आणि पुन्हा शिवसेनेमध्ये आपली जागा निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
परंतू जोशींचा हा प्रयत्न राज्य सरकारने हाणून पाडला. शिवाजी पार्क हे खेळासाठी राखीव असल्याने या जागेवर कोणतेही बांधकाम करता येत नसल्याचे स्पष्ट करून शिवसेनाप्रमुखांचे अंत्यसंस्कार झालेली जागा त्वरित खाली करण्याचे सांगण्यात आले. त्यासाठी ज्या मुंबई महानगर पालिकेमध्ये शिवसेनेची गेली १७ वर्षे सत्ता आहे त्या पालीकेमाधुनच मुंबईच्या महापौर व खासदार संजय राऊत यांना नोटीसा पाठवण्यात आल्या. जागा खाली करावी लागणार असल्याने आपली काहीच किंमत उरणार नाही म्हणून या नेत्यांनी शिवाजी पार्कच्या एका कोपऱ्यातील जागा ठरवून बाळासाहेबांची आठवण म्हणून हिरवळ निर्माण करण्यात एईल असे सांगण्यात आले होते. आज सात महिने झाले तरी पालिकेमध्ये सत्ता असूनही सेनेला हि हिरवळ निर्माण करता आलेली नाही.
स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी या हिरवळ निर्माण करण्याच्या आराखड्यामध्ये बदल करण्यात आले आहेत. आता हिरवळीच्या बाजूला लाकडे लावून हि हिरवळ संरक्षित केली जाईल असे नुकतेच जाहीर केले आहे. आता पावसाळा जवळ आला असल्याने पावसाळ्या नंतरच हे काम होऊ शकते. यामुळे बाळासाहेबांच्या स्मृतीदिनापर्यंत तरी हि हिरवळ बनेल याची शक्यता कमीच आहे. याच शेवाळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव दादरच्या उद्यानाला असताना या उद्यानाचे नाव शिवतीर्थ करावे असा प्रस्तवा पालिकेमध्ये आणला होता परंतू इतर सर्वच राजकीय पक्षांनी विरोध केल्याने व मुंबईकर नागरिकांमध्ये याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटल्याने शेवाळे यांच्यावर हा प्रस्ताव पालिका सभागृहामध्ये येणार त्या दिवशी गैरहजार राहण्याची नामुष्की आली होती.
आता गेले आठवडाभर शिवसेनाप्रमुखांच्या अंत्यविधी वेळी पोलिस उपआयुक्त धनंजय कुलकर्णी आणि मुंबई महानगर पालिका यांच्यामध्ये कोणत्या उपाय योजना करावयाच्या व सोयी सुविधा पोहचवायच्या याबाबत बैठक झाली होती. सेनाप्रमुखांच्या निधना नंतर अंत्यसंस्कार करण्याच्या वेळे पर्यंत कमी वेळ असल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही क्यामेरे, एल.ई. डी. टीव्ही, फिरती शौचालये, फ़ॉगिंग, स्वच्छता यावर पालिकेने तातडीने ४ लाख ९९ हजार रुपये खर्च केले. या खर्चाला मंजुरी मिळणे आवश्यक असल्याने पालिका प्रशासनाने तसा प्रस्ताव स्थायी समिती समोर आणला होता. काही वृत्तपत्रांनी ठाकरे यांच्या अंत्यविधीचा खर्च पालिका करणार अशा बातम्याच प्रसिद्ध केल्या. यामुळे हातावर मोजता येईल अशा काही काही मोजक्याच पत्रकारांना नेहमी भेटणाऱ्या महापौर सुनील प्रभू व स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांना याबाबत सत्य परिस्थिती काय याचा खुलासा करावा लागला होता.
पालिकेला हा खर्च स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून करावा लागला असला तरी बाळासाहेबांच्या नावाने शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी करोडो रुपये कमावले तरी बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराचे पैसे सेनेचे पदाधिकारी देत नसतील तर बाळासाहेब आम्हाला वंदनीय असून त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी झालेले पैसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या खिश्यातून पालिकेला देईल असे मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी जाहीर केले होते. बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराचे पैसे मनसे देणार या कल्पनेनेच शिवसेनेमध्ये अस्वस्थता होऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ५ लाख रुपयांचा धनादेश खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते पालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलोटा यांच्याकडे सुपूर्द केला.
चेक सुपूर्द केल्याने आपण लढाई जिंकली असल्याच्या स्वप्नात असलेल्या राहुल शेवाळे यांनी दुसऱ्या दिवशी स्थायी समिती पुढे हा प्रस्ताव मंजुरू साठी आला असता शिवसेनेने ५ लाख रुपयांचा चेक दिला असून याचा खुलासा करावा अशी मागणी केली असता अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी चेक दिला असल्यास माझ्या सहकाऱ्यांकडे दिला असेल तो चेक मिळाला कि नाही याबाबत मला काही माहिती नाही. पालिकेने जो खर्च केला आहे तो नियमाप्रमाणे ३ लाखाच्या वरचा असल्याने स्थायी समितीने मंजूर करावा असे स्पष्ट केले. पालिका प्रशासनाकडून ५ लाख रुपयांचा चेक देवूनही प्रशासन कोणताही खुलासा करत नसल्याचे पाहून सत्ताधारी शिवसेनेच्या सदस्यांच्या तोंडावर बारा वाजलेले असल्याने ५ मिनिटे कोणी काही बोलावे याचे भानच या सदस्यांना नव्हते.
पालिका प्रशासन आपल्याला हवा तसा कोणताही खुलासा करत नसल्याचे पाहून अस्वस्थ झालेल्या स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे रागारागातच यांनी पालिकेच्या चिटणीस विभागावर याचे खापर फोडत हा प्रस्ताव इथे आलाच कसा, प्रस्ताव आणायचा होता तर मला आधी का दाखवला नाही, असा प्रस्ताव थेट स्थायी समितीत मंजुरी साठी पाठवणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाही करावी असे निर्देश दिले. हा सर्व प्रकार बघून शेवाळे हे चुकीचे करत असून स्वतः अपयशी ठरल्याने त्याचा राग चिटणीस विभागातील कर्मचाऱ्यांवर काढत असल्याची चर्चा पत्रकारांमध्ये होती. शेवटी पालिकेने जो खर्च केला आहे त्याला मंजुरी देण्याचे आदेश राहुल शेवाळे यांना द्यावे लागले आहेत.
शिवसेनाप्रमुखांच्या अंत्ययात्रेवेळी पालिकेने केलेला खर्च मनसे पैसे भरणार या भितीनेच शिवसेनेने ५ लाख रुपयांचा चेक दिला असला तरी पालिकेने जो खर्च केला आहे तो पैसा कोणत्याची संस्थेकडून किवा एखाद्या व्यक्तीकडून पालिकेला घेत येत नाही. यामुळे शिवसेनेने ५ लाख रुपयांचा चेक जरी दिला असला तरी पालिका प्रशासन काय म्हणून हा पैसा घेणार असा प्रश्न निमण होणार असल्याने पालिकेने चेक जरी स्वीकारला असला तरी तो चेक स्वीकारला असे कुठेही पालिका अधिकृतपणे सांगू शकत नाही. हे सर्व पालिकेमध्ये १७ वर्षे सतत सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेला व नगरसेवकांना माहित नसणे हि एक लाजिरवाणी गोष्टच म्हणावी लागेल.
हे सर्व प्रकार कमी म्हणून पालिकेमधील सत्ताधाऱ्यानी रेसकोर्सचा विषयात हात घातला आहे. बाळासाहेबांचे मुंबई मध्ये थीम पार्क असावे असे स्वप्न होते. त्यासाठी रेसकोर्सपेक्षा दुसरी कोणतीही चांगली जागा नाही त्यामुळे ३१ मे २०१३ रोजी रेसकोर्सचा करार संपताच पालिका आपल्या मालकीची जागा आपल्या ताब्यात घेवून बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करणार अशी घोषणा पालिकेमधील सत्ताधारयानी केली आहे. आता पर्यंतचा अनुभव पाहता रेसकोर्सची जमीन जरी पालिकेच्या मालकीची असली तरी या जागेचा करार राज्य सरकार करत आले आहे. यामुळे यावेळीही राज्यसरकारने पुन्हा हा करार वाढवण्याचे संकेत दिले असल्याने हि जागा पालिकेला मिळण्याची शक्यता फार कमी आहे. तरीही बाळासाहेबांचे नाव या जागेवरील थीम पार्कला दिले जाईल अशी स्वप्ने शिवसैनिकांना दाखवली जात आहेत.
एक मात्र नक्की बाळासाहेबांचा चौथरा, शिव तीर्थ नामांतर, बाळासाहेबांची आठवण म्हणून निर्माण केली जाणारी हिरवळ, बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेवेळी पालिकेला करावा लागलेला खर्च असो सर्व वेळी शिवसेनेची नाचक्की झाली आहे. हि नाचक्की आम्ही किती कडवे शिवसैनिक आहोत हे दाखवण्याच्या नादात झाला आहे. बाळासाहेब असे पर्यत अशी नाचक्की कधीही शिवसेनेची झाली नव्हती. बाळासाहेब आज जर असते तर शिवसेनेची नाचक्की करणाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली असती. परंतू बाळासाहेब नसल्याने शिवसेनेची नाचक्की करणाऱ्यांना सध्या मोकळे रान मिळाले आहे. अशा लोकांवर कारवाही करण्याची गरज असल्याचे सध्या शिवसैनिकांमध्ये चर्चिले जाता आहे.
अजेयकुमार जाधव
मो. 09969191363
No comments:
Post a Comment