मुंबई ( 'महान्यूज' ): मुंबईच्या दौऱ्यावर आलेल्या चीनचे पंतप्रधान ली केक्विंग आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात आज मुंबई तसेच महाराष्ट्रातील उद्योग, पायाभूत सुविधा, फार्मा या क्षेत्रातील गुंतवणूक संधीविषयी चर्चा झाली. विशेषत: मुख्यमंत्र्यांनी राज्यात चिनी कंपन्यांना मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करता येईल असे सांगितले. राज्यातील विविध औद्योगिक कॉरीडॉर्स उभारणीत चीनचे सहकार्य मिळण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी चीनच्या पंतप्रधानांनी मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनविण्यासाठी महाराष्ट्र सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती मुख्यमंत्र्यांकडून घेतली आणि याबद्दल कौतुक केले.
हॉटेल ताज येथील गोल्डन रुम येथे सुमारे पाऊण तास चाललेल्या या भेटीच्या वेळी पंतप्रधान ली केक्विंग यांच्यासमवेत चीनचे काही मंत्री व वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी उद्योग मंत्री नारायण राणे, राजशिष्टाचार मंत्री सुरेश शेट्टी, मुख्य सचिव जयंत कुमार बाँठिया, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव अजित कुमार जैन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी त्याचप्रमाणे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मागास भागात चिनी कंपन्यांना गुंतवणूक संधी यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरीडॉर त्याचप्रमाणे मुंबई विकासाबाबत सविस्तर माहिती दिली. मुंबईतील वाहतूक समस्येवर मार्ग काढण्यासाठी योजलेले उपाय विशेषतः एमटीएचएल, जलमार्ग, कोस्टल रोड, मोनो रेल-मेट्रो यामुळे मुंबई हे जागतिक नकाशावर एक महत्वाचे शहर म्हणून ओळखले जाईल असे यावेळी सांगितले. राज्याच्या मागास भागात जास्तीत जास्त गुंतवणूक होऊन रोजगार कसा वाढीस लागेल यासाठी नवीन औद्योगिक धोरणाचा देखील चीनच्या पंतप्रधानांनी उत्सुकतेने माहिती घेतली. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणाची माहितीही दिली व परकीय गुंतवणुकीस भरपूर वाव असल्याचे सांगितले. महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे कापूस उत्पादक राज्य असून या ठिकाणी यंत्रमाग आणि कापूस ते तयार कापड अशी संपूर्ण व्हॅल्यू चेनमध्ये चीनला गुंतवणूक करता येईल, असे मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले. नागरी सुविधांचा दर्जा वाढण्यासाठी सहकार्य महाराष्ट्रातील नागरी भागातील पायाभूत सुविधांचा दर्जा अधिक उत्तम कसा होईल यादृष्टीने चीन मधील कंपन्यांचे सहकार्य घेऊन पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन याबाबतीत करार करता येऊ शकतील. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रात संशोधन आणि काही नाविन्यपूर्ण उपक्रम राबविता येतील का यावरही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमवेत चर्चा केली. वाहन निर्मितीसाठी रेड कार्पेट सध्या सुमारे 100 चिनी कंपन्या भारतात कार्यरत असून प्रमुख 4 कंपन्या महाराष्ट्रात आहेत. या कंपन्या बांधकाम साहित्य, ट्रक निर्मिती, वातानुकुलित यंत्रे, रेफ्रिजरेटर या क्षेत्रातील असून पायाभूत सुविधांमध्ये चिनी कंपन्यांना भरपूर वाव असल्याचे मुख्यमंत्री चर्चेदरम्यान म्हणाले. फोटॉन बिजिंग या कंपनीसाठी नुकतीच चाकण येथे वाहन निर्मिती उद्योगासाठी जमीनही देऊ केली आहे. या भागात चीन मधील वाहन निर्मिती उद्योगाला गुंतवणुकीस वाव असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी निदर्शनास आणले. चिनी कंपन्यांनी गुंतवणुकीत रस दाखविल्यास या कंपन्यांसाठी स्पेशल इन्व्हेस्टमेंट झोन निर्माण करण्याची तयारी देखील मुख्यमंत्र्यांनी चर्चेच्यावेळी दाखविली. विविध शहरांमध्ये नव्याने पायाभूत सुविधांची उभारणी, आयटी मधील प्रगती यावर चीनच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्राचे कौतुक केले. 27 वर्षांपूर्वी मी मुंबईला आलो होतो, त्यावेळची मुंबई आणि आताची यात खूप फरक जाणवला. आपला मुंबई भेटीचा उद्देश हा महाराष्ट्रासारख्या भारतातील सर्वात मोठ्या ओद्योगिक आणि वित्तीय केंद्र असलेल्या राज्यातील प्रगती जाणून घेण्याचा आणि येथील उद्योग, पायाभूत, आयटी क्षेत्रात अधिक गुंतवणूक संधी कशी निर्माण करता येईल याबाबत प्रत्यक्ष येथील उद्योग प्रतिनिधींना भेटून त्यांच्याशी चर्चा करण्याचा आहे हे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. भारत आणि चीन यांची मिळून लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या एक तृतियांश एवढी असून दोन्ही देशातील बौध्दिक क्षमतेच्या जोरावर आपण मोठी प्रगती करू शकतो. पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या भेटी दरम्यान आपण चीन-भारत-बांगला देश-म्यानमार असा औद्योगिक कॉरिडॉर उभारु शकतो यावर चर्चा केल्याचे चीनचे पंतप्रधान यावेळी म्हणाले. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त करतांना सांगितले की, फेब्रुवारीमध्ये ब्रिटनचे पंतप्रधान तसेच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष भारताच्या भेटीवर आले असता आवर्जून मुंबईत आले, येथील गुंतवणूकदार, उद्योगपती यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री म्हणून मला देखील त्यांच्याशी चर्चा करता आली. या देशांच्या नेत्यांनी आज मुंबई तसेच महाराष्ट्रात गुंतवणूकीची इच्छा व्यक्त करुन एक प्रकारे येथील विकासावर शिक्कामोर्तबच केले आहे. |
Post Top Ad
22 May 2013
Home
Unlabelled
महाराष्ट्रातील गुंतवणूक करण्यात चीनच्या पंतप्रधानांनी दाखविले स्वारस्य
महाराष्ट्रातील गुंतवणूक करण्यात चीनच्या पंतप्रधानांनी दाखविले स्वारस्य
Share This
About Anonymous
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment