मराठी द्वेष्टे गेल्याचा आनंद - उद्धव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 May 2013

मराठी द्वेष्टे गेल्याचा आनंद - उद्धव

मुंबई : कर्नाटकच्या सीमा भागातील मराठी माणसांवर अन्याय करणारे भाजपा सरकार सत्तेवरून गेल्याचा आनंद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. मात्र त्याच वेळी लोकसभेच्या पूर्वी होणार्‍या राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील निवडणुकांमध्ये भाजपालाच यश मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. महाराष्ट्र एकीकरण समितीचे दोन आमदार निवडून आल्याबद्दल त्यांनी आनंदही व्यक्त केला. जसजशी लोकसभेची निवडणूक येईल, तसा काँग्रेसचा प्रवास उलट्या दिशेने सुरू होईल, असेही ते म्हणाले. शिवसेना भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कर्नाटकात कोणत्याही पक्षाचे सरकार असो, प्रत्येकाने सीमा भागातील मराठी माणसांवर सातत्याने अन्यायच केला आहे. भाजपा सरकारनेदेखील मराठी माणसावर अन्याय केला. त्यामुळे मराठी माणसावर अन्याय करणारे सरकार गेले, याचा आपल्याला आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी या वेळी व्यक्त केली. मात्र कर्नाटकात झालेला पराभव हा भाजपाचे अपयश नसून तेथे राज्यकारभार करणार्‍या व्यक्तींच्या कामांचा परिपाक असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र एकीकरण समितीचे पाच आमदार निवडून येतील, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांचे दोन आमदार निवडून आले आहेत, त्याचाही आम्हाला आनंद असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. येदियुरप्पांच्या सरकारने महिला महापौरांवर राजद्रोहाचा खटला दाखल केला होता. त्यांची भूमिका कायम मराठी विरोधी होती. अशी मराठीद्वेष्टी राजवट गेल्याचा आनंद असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. कर्नाटकातील आजपर्यंतच्या सर्व सरकारांनी मराठी माणसावर सातत्याने अन्यायच केला आहे. यापुढेही जर सरकारकडून अन्याय होणार असेल तर सीमा भागात राष्ट्रपती राजवट लागू करा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र एकीकरण समितीचे दोन उमेदवार निवडून आल्याचा आपल्याला आनंद झाला असल्याचेही ते म्हणाले. कर्नाटकात मिळालेल्या यशाने काँग्रेसने हुरळून जाऊ नये. केंद्रातील सरकारचे एकाहून एक लागोपाठ उघड होणारे घोटाळे पाहता लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रवास उलट्या दिशेने सुरू होईल, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी या वेळी लगावला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad