मुंबई : महानगर पालिकेत 'माहितीचा अधिकार अधिनियम -२00५'मधील तरतुदींची सुलभतेने व काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सूचना व सल्ला देण्यासाठी तांत्रिक सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्षपद केंद्रीय माहिती आयोगाचे माजी मुख्य माहिती आयुक्त शैलश गांधी भूषवणार आहेत. माहितीचा अधिकार अधिनियमाचे कार्यकर्ते भास्कर प्रभू, मिलिंद मुळे आणि इतर अधिकार्यांचा समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
'माहितीचा अधिकार अधिनियम-२00५'बाबत तांत्रिक सल्लगार समितीची गुरुवारी बैठक झाली. आयुक्त सीताराम कुंटे यांनी तांत्रिक सल्लागार समितीची स्थापना करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. संस्थात्मक पातळीवर अशा प्रकारची तांत्रिक सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या समितीची स्थापना करून मुंबई मनपाने माहितीच्या अधिकारात पारदर्शकपणा आणण्याच्या उद्देशाने पाऊल उचलल्याची स्तुती गांधी यांनी केली. नागरिकांना आवश्यक माहिती वेळेवर आणि अचूक देण्याबाबत काय करता येऊ शकते? यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. मनपातील इमारत प्रस्ताव आणि कारखाने खात्यांकडे येणार्या अर्जांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. त्यावर मनपा काय करत आहे? असा सवाल या वेळी गांधी यांनी उपस्थित केला. त्या वेळी उपायुक्त (माहिती व तंत्रज्ञान) वसंत प्रभू यांनी या मुद्दय़ावर कारवाई सुरू असून लवकरात लवकर पूर्ण होईल, असे उत्तर दिले. समितीने इमारत व प्रस्ताव खात्याच्या कार्यालयास व महापालिकेच्या एका विभागास भेट देऊन आज कोणत्या विषयावर येतात, त्यानुसार कार्यवाही करण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.
मनपाच्या संकेतस्थळावर माहितीचा अधिकार अधिनियम २00५ अन्वये पुरविण्यात आलेल्या माहितीत सुधारणा होण्याच्या दृष्टीने समितीचे सदस्य भास्कर प्रभू यांच्या समवेत दोन अधिकारी एफ/दक्षिण विभागाला भेट देणार आहेत. यासंबंधीची अद्ययावत प्रक्रिया मार्गदर्शक बनविण्यात येणार आहे. विभाग कार्यालयाची मार्गदर्शक प्रक्रिया तयार झाल्यानंतर जल विभाग, इमारत व प्रस्ताव खाते यांच्यासाठी एक नमुना मार्गदर्शिका बनविण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment