मुंबई : रिक्षा परवान्याच्या वाटपाचा गेली सहा वर्षे चाललेला घोळ, दलालांनी चालवलेली रिक्षा परमीटची हेराफेरी, शिवाय बँका, पतपेढय़ा, परमिटवाला, बँकवाला १0 टक्के कमिशन घेऊन रिक्षा मालकांच्या परस्पर सह्या घेऊन राज्यभरातील रिक्षावाल्यांची लूट करीत आहेत. ही लूट थांबवण्यासाठी तसेच मागणी तिथे पुरवठा कायद्यानुसार परवाना मिळवून देण्यात यावा, या मागणीसाठी ३ जून रोजी सकाळी १0 वाजल्यापासून अंधेरी येथील आरटीओ कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती लोकनेते राजाराम बापू पाटील रिक्षा मालक व चालक सेवा संघाचे अध्यक्ष श्यामराव मोकाशी यांनी दिली.
अंधेरी आरटीओमधून ६५ हजार रिक्षा परवाने दिलेले आहेत. आरटीओने कायदे पाळले नाहीत म्हणून परमीटराज निर्माण झाले आहे. आता जे लोक रिक्षा चालवीत आहेत, जे कायद्यानुसार रिक्षा व्यवसाय करीत आहेत, त्यांच्या नावावर रिक्षा होणे आवश्यक आहे. त्यासाठी या आंदोलनादरम्यान रिक्षावाल्यांचे सामूहिक नोंदीचे अर्ज घेण्यास सरकारला भाग पाडण्यात येणार आहे. परवाने दलालांच्या कब्जातून रिक्षाचालकांची मुक्ती करण्याचा निर्धार संघटनेने केला आहे. त्यासाठी ठिय्या आंदोलनात जेवढे रिक्षाचालक रिक्षा खरेदीच्या अँग्रीमेंटसह अर्ज करतील, त्या अर्जांची आकडेवारी त्याच दिवशी जाहीर केली जाईल. त्यानंतर कुणालाही अर्ज करता येणार नाही. ज्या रिक्षाचालकांकडे अंधेरी आरटीओमध्ये ज्यांच्या रिक्षांची नोद आहे, त्यांनीच सामुदायिक नोंदीत अर्ज घेऊन यावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment