बचतीच्या वाढीव गुणोत्तर दरात वृद्धी होणे आवश्यक - पंतप्रधान - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 May 2013

बचतीच्या वाढीव गुणोत्तर दरात वृद्धी होणे आवश्यक - पंतप्रधान



मुंबई : बचतीच्या वाढीव गुणोत्तर दरात वृद्धी होणे आवश्यक असून ही बचत देशाच्या आर्थिक संपत्तीमध्ये रुपांतरित झाल्यास त्याचा विविध समाजोपयोगी कार्यासाठी उपयोग करता येऊ शकेल, असा विश्वास पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केला.

हॉटेल ग्रँण्ड हयात येथे सेबीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. या सोहळ
्यास केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम, केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री कपील सिब्बल, सिंगापूरचे उपपंतप्रधान टी. षन्मुगरत्नम, राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय मंत्री व्ही. नारायण स्वामी, मिलींद देवरा, केंद्रीय वित्तराज्यमंत्री नमो नारायण मीना, सेबीचे अध्यक्ष यु.के. सिन्हा आदी उपस्थित होते.

सेबीच्या मजबुतीकरणासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यास शासन कटिबध्द आहे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले, गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीला संरक्षण देणे महत्वाचे असून याकामी सेबी अत्यंत प्रभावीपणे कार्य करत आहे. सेबीने केलेल्या प्रयत्नांद्वारे भागभांडवल बाजारपेठ आधुनिक करण्याकामी यश मिळाले असून देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट सेवा मिळाल्या आहेत. एकत्रित बचत ही नेहमीच खेळती असायला हवी. किरकोळ गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी राजीव गांधी इक्विटी सेव्हींग्ज् योजना, म्युच्युअल फंड यासारखी पावले उचलण्यात आली आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पी. चिंदंबरम म्हणाले, सेबीच्या प्रयत्नामुळे भारतात अतिशय नियंत्रित पध्दतीने चालविले जाणारे कॅपिटल मार्केट निर्माण झाले आहे. बाजारातील चढ-उतारावर सातत्याने लक्ष ठेवणे आणि गुंतवणूकदारांचा विश्वास प्राप्त करणे हे ध्येय सेबीने ठेवले आहे. सेबीने यापुढेही अतिशय निर्भयपणे कार्यरत रहावे व कोणाच्याही दबावाखाली काम करु नये, असे आवाहनही अर्थमंत्र्यांनी यावेळी केले.

यावेळी सेबीच्या 25 वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीची आठवण म्हणून भारतीय डाक विभागातर्फे टपाल तिकीटाचे प्रकाशन करण्यात आले. इंडियन सिक्युरीटी मार्केटच्या इतिहासाचा आढावा घेणाऱ्या 'बनयान ट्री टू ई-टेंडरींग' या पुस्तकाचे प्रकाशन पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे जागतिक आर्थिक नकाशावर महत्वाचे स्थान आहे. आज महाराष्ट्रात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक होते. औद्योगिक आणि वित्तीय केंद्र असलेल्या मुंबई शहराच्या विकासासाठी दळणवळणाच्या अनेक प्रगत अशा सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मेट्रो रेल्वेचे काम प्रगतीपथावर असून जगातली पहिली मोनो रेल मुंबईत सुरू होणार आहे. औद्योगिक गुंतवणुकीसाठी राज्यामध्ये पायाभूत सुविधांवर अधिक भर देण्यात आला आहे. उद्योग, पायाभूत सुविधा, आयटी, कृषी उद्योग आदी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. मुंबई शहरातील पायाभूत सुविधांचा दर्जा अधिक उत्तम कसा होईल यादृष्टीने पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन याबाबतीत विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याच बरोबर मुंबईतील वाहतूक समस्येवर मार्ग काढण्यासाठी एमटीएचएल, जलमार्ग, कोस्टल रोड ही विकासकामे प्रगतीपथावर आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad