मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या मालकीची घोडपदेव येथील ‘हारूसिंग शोभराज चाळ’ जबरदस्तीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न लोखंडवाला बिल्डरने चालविला आहे. ही मालमत्ता पालिकेची असल्याचा सरकार दरबारी कोणताही पुरावा नाही, तशी नोंदही नसल्याचा अपप्रचार करत पुनर्विकासाच्या नावाखाली ‘लोखंडवाला इन्फ्रास्ट्रक्चर’ने जबरदस्तीने चाळीचा ताबा घेऊन मोक्याच्या ठिकाणी असलेल्या भूखंडावरच डल्ला मारला आहे.
माझगाव महसूल विभागाच्या हद्दीतील भूभाग क्रमांक २/७२० ची मालकी मुंबई महापालिकेकडे असून मालमत्ता पत्रकदेखील पालिकेच्या नावावर आहे. मात्र ‘लोखंडवाला इन्फ्रास्ट्रक्चर’ने आपण ही चाळ हरूसिंग शोबराज यांच्याकडून खरेदी केल्याचा दावा करत अनधिकृतरित्या पालिकेची मालमत्ता ताब्यात घेतली आहे. वर्षानुवर्षे या ठिकाणी राहणार्या रहिवाशांनी ही मालमत्ता बिल्डरच्या घशात जाऊ नये यासाठा पाठपुरवा केल्यानंतर पालिकेने या इमारतीवर फलक लावून ही इमारत पालिकेच्या मालकीची असल्याचे स्पष्ट करत अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई करू, असा इशारा दिलेला असतानाही ‘लोखंडवाला इन्फ्रास्ट्रक्चर’ने ही मालमत्ता आपली असल्याचा दावा करणारा फलक त्या ठिकाणी लावून अनधिकृतपणे पालिकेच्या मालमत्तेचा ताबा घेतल्याचे उघडकीस आले आहे.
घोडपदेव येथील या इमारतील १२५ भाडेकरू राहत असून सदर मालमत्ता १९६९ पासून पालिकेच्या ताब्यात असल्याचे न्यायालयाच्या कागदपत्रावरून स्पष्ट होत आहे. मालमत्ता पत्रकात देखील सदर इमारत पालिकेच्या ताब्यात असल्याची नोंद असताना चाळीतील काही रहिवाशांना हाताशी धरून पुनर्विकासाच्या नावाखाली मोक्याच्या भूखंडावर ‘लोखंडवाला इन्फ्रास्ट्रक्चर’कडून दावा केला जात आहे. याला विरोध करणार्या रहिवाशांच्या विरोधात पत्रकबाजी तसेच पोलीस ठाण्यात तक्रारी करून धमकावण्याचे प्रकार बिल्डर करत आहे.
हारूसिंग शोभराज यांच्याकडून इमारत खरेदी केल्याचा दावा करत जबरदस्तीने पालिकेची मालमत्ता ताब्यात घेऊन ५० ते ६० वर्षापासून या ठिकाणी राहणार्या रहिवाशांना पुनर्विकासाच्या नावाखाली मोक्याचा भूखंड बळकावला जात आहे. याबाबत स्थानिक रहिवाशांनी अतिरिक्त आयुक्त असिम गुप्ता यांच्याकडे लेखी तक्रार करत सदर इमारत पालिकेच्या ताब्यात घेण्याची मागणी केली. स्थानिक नगरसेवक रमाकांत राहटे यांच्या उपस्थितीत असीम गुप्ता यांच्याकडे १२ मार्च २०१३ रोजी झालेल्या बैठकीतही ही इमारत पालिकेच्या दप्तरी दाखल करून मासिक भाडे सुरू करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. मात्र पालिकेकडून अद्याप त्याबाबत कोणतीही कारवाई केली जात नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जागेच्या वादाबाबत विकासकानेही कागदपत्रेही सादर केली आहेत. या कागदपत्रांची तपासणी पालिकेच्या मालमत्ता विभागाकडून करण्यात येत आहे. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतरच महापालिका पुढील कारवाई करेल. - संजोग कबरे, सहाय्यक आयुक्त, ई वार्ड
No comments:
Post a Comment