मुंबईच्या महापौरांचा अवमान - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 May 2013

मुंबईच्या महापौरांचा अवमान

देशाचे प्रमुख प्रधानमंत्री असतात, राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री असतात तसेच मुंबई महानगर पालिकेचे प्रमुख महापौर असतात. यामुळे मुंबईचे प्रथम नागरिक म्हणून मुंबईच्या महापौरांना मान आहे. एखाद्या विषयावर चर्चा करावयाची झाल्यास किंवा सल्ला घ्यावयाचा असल्यास पालिकेच्या आयुक्तांना सुद्धा बोलावून घेण्याचा अधिकार असला तरी पालिका आयुक्तांच्या हाताखाली काम करणाऱ्या जनसंपर्क अधिकाऱ्याने मुंबईच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौरांचाच अवमान केल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. 

१ मे या "महाराष्ट्र दिनाच्या" निमित्ताने मुंबई महानगर पालिकेच्यावतीने एक पत्रिका प्रसिद्ध करण्यात आली होती. या पत्रिकेचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायण व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थिथित शिवाजी पार्क येथील समारंभात करण्यात आले. सदर पत्रिकेचे उद्घाटन झाल्यानंतर पालिकेतील सत्ताधाऱ्यांमध्ये मुंबईच्या प्रथम नागरिक व पालिकेतील सत्तेचे प्रमुख असलेल्या महापौरांचा फोटो जनसंपर्क अधिकाऱ्याच्या फोटो नंतर टाकल्याने प्रचंड संताप निर्माण झाला होता. 

एकीकडे राज्यपाल आणि मुख्यमंत्री ९ वाजून ३० मिनिटांनी येतील असे सर्व पक्षीय नेत्यांना सांगण्यात आले होते. राज्यपाल आणि मुख्यमंत्री ठरल्या वेळेप्रमाणे पावणे नऊ वाजता येवून कार्यक्रम आटोपून निघून गेल्या नंतर सर्व पक्षीय नेते पोहोचल्यावर कार्यक्रम संपल्याचे समजताच संताप व्यक्त करणाऱ्या नेत्यांच्या हातात पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रिकेची प्रत मिळाल्यावर त्या संतापात भर पडत महापौरांचा अवमान केल्याची चर्चा कार्यक्रमा ठिकाणी चांगलीच रंगली होती. 

पालिकेची सदर पत्रिका प्रसिद्ध करण्याची जबाबदारी जनसंपर्क अधिकारयाची होती. हि जबाबदारी पार पाडत असताना, पालिकेच्या प्रशासनाची पत्रिका प्रसिद्ध करायची असताना, जनसंपर्क अधिकाऱ्याने आपण संपादक बनलो आहोत या धुंदीमध्ये मुंबईच्या प्रथम नागरिक असलेल्या व पालिकेचे प्रमुख असलेल्या महापौर सुनील प्रभू यांचा फोटो आपल्या स्वताच्या फोटो नंतर टाकून आपण महापौरांपेक्षा मोठे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रकार सर्व नगरसेवकांच्या लक्षात येताच सर्वच पक्षीय नगरसेवकांनी या जनसंपर्क अधिकाऱ्याचा निषेध केला आहे. 

नुकत्याच झालेल्या स्थायी समिती बैठकीमध्ये सत्ताधारी शिवसेनेच्या स्थायी समिती सदस्य महेश पारकर यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत या पत्रिकेमध्ये असंख्य चुका असून पत्रिकेच्या संपादक म्हणवणाऱ्या विजय खबाले यांनी महापौर सुनील प्रभू यांच्या फोटो आधी स्वतःचा फोटो व नाव आधी टाकून स्वताचा मोठेपणा सिद्ध करण्याचा प्रकार केला आहे. हा प्रकार निषेधार्य असून या जनसंपर्क अधिकारयावर कारवाही करावी अशी मागणी केली. राष्ट्रवादीचे गटनेते व स्थायी समिती सदस्य धनंजय पिसाळ यांनी महापौर हे पद मोठे असून जनसंपर्क अधिकारी या पदापेक्षा छोटे असल्याने महापौरांच्या फोटो आधी स्वताचा फोटो जनसंपर्क अधिकारयाने टाकणे चुकीचे असल्याचे सांगितले. 

काँग्रेसच्या स्थायी समिती सदस्य शितल म्हात्रे यांनी गणपत नगर वर पालिकेकडून तोडक कारवाही चालू असताना पालिकेच्या याच जनसंपर्क अधिकारयाने चुकीची प्रसिद्धीपत्रके वृत्तपत्रांकडे प्रसिद्धीसाठी पाठवली होती, यामुळे वारंवार चुका जर जनसंपर्क अधिकारी करत असेल तर अशा जनसंपर्क अधिकाऱ्यावर कारवाही करणे गरजेचे असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. भाजपचे स्थायी समिती सदस्य विठ्ठल खरटमोल यांनी जनसंपर्क अधिकारी खबाले हे महापौरांच्या वरच्या पदावर आपण आहोत असे समजत असावेत म्हणून महापौरांच्या आधी त्यांनी स्वतःचा फोटो टाकला, वृत्तपत्रांकडे जाहिराती पाठवतानाही जाहिराती मध्ये असंख्य चुका करतात त्यांच्या कामावर त्यांचे लक्ष नसते असे आरोप करून जनसंपर्क अधिकारी खबाले यांच्यावर कारवाही करावी अशी मागणी केली आहे. 

पालिकेमध्ये शिवसेनेची १७ वर्षे सत्ता असताना या कार्यकाळात सत्ताधाऱ्यांची हाजी हाजी करत पालिकेच्या जनसंपर्क अधिकारी या पदा पर्यंत पोहोचलेल्या खबाले यांनीच महापौर पदावर असलेल्या शिवसेनेच्या सुनील प्रभू यांचाच अवमान केल्याने स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी सुद्धा संताप व्यक्त करून जनसंपर्क अधिकाऱ्याला ताबडतोब स्थायी समिती सभागृहामध्ये हजर करा असे निर्देश पालिका प्रशासनाला दिले. परंतु खबाले हे सुट्टीवर असल्याचे सांगून या प्रकरणाची चौकशी करून कारवाही करू असे नेहमी प्रमाणे दिले जाणारे आश्वासन देवून अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी सत्ताधारयाना शांत केले आहे. 

अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी या आधीही कित्तेक वेळा चौकशी करून कारवाही करू अशी कित्तेक आश्वासने पालिका प्रशासनाच्या वतीने दिली आहेत, त्यापैकी किती वेळा कारवाही झाली हा संशोधनाचा विषय आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांना शांत करण्यासाठी असे सांगितले गेले असेलही परंतु जनसंपर्क अधिकारयाकडून जो प्रकार घडला आहे यावर निलंबन करून जनसंपर्क अधिकाऱ्याला आपण कोण आहोत याची आठवण करून देण्याची गरज आहे. ते ज्या पत्रिकेचे संपादक म्हणवून घेत आहेत ती पत्रिका त्यांच्या खाजगी मालकीची नसून ती पालिकेच्या मालकीची असल्याने पालिकेचे नियम व राजशिष्टाचार यासारखे प्रकार पाळावे लागतात याची आठवण खबाले यांना करून देण्याची गरज आहे. जर खबाले राज्य सरकारच्या अखत्यारीतील एखादे अधिकारी असते आणि त्यांनी असा प्रकार एखाद्या मंत्र्याबाबत केला असता तर त्यांना ताबडतोब निलंबित केले असते किवा गडचिरोलीला बदली करू पाठवले असते. 

परंतू पालिका प्रशासनाने सतत खबाले यांना पाठीशी घालण्याचे काम केले आहे. याच जनसंपर्क विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापारीनिर्वान दिन माहिती पुस्तिके मध्ये वाढीव बिल मंजूर करून भ्रष्टाचार केला, याच खबाले यांची शैक्षणीक अहर्ता नसताना त्यांना जनसंपर्क अधिकारी बनवण्यात आले आहे असे प्रकार माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद पारगावकर यांनी उघड केले होते त्याला महानायकने चांगलीच प्रसिद्धी दिली होती. त्याच वेळी पालिकेच्या आयुक्त व वरिष्ठ अधिकारी यांनी या जनसंपर्क अधिकाऱ्याला पाठीशी घालायचे काम केलेच नसते तर आज या जनसंपर्क अधिकाऱ्याकडून मुंबईच्या प्रथम नागरिक असलेल्या मुंबईच्या महापौरांचा अवमान झालाच नसता. 

अजूनही वेळ गेलेली नाही पालिकेच्या आयुक्त सीताराम कुंटे यांनी सदर प्रकरणाची गंभीर दखल घेवून महापौरांचा अवमान करणाऱ्या जनसंपर्क अधिकारी खबाले यांच्यावर कडक कारवाई करून पालिका प्रशासनात कोणत्या अधिकाऱ्याचे काय पद आहे हे दाखवून देण्याची गरज आहे. अन्यथा मुंबईच्या महापौरांचा अवमान करूनही जनसंपर्क अधिकाऱ्यावर होत नसल्यास पालिकेचे प्रशासन सत्ताधारयाना जुमानत नसल्याचा तसेच सत्ताधाऱ्यांचा पालिका प्रशासनावर अंकुश नसल्याचा संदेश मुंबईमधील नागरिकांपर्यंत गेल्या शिवाय राहणार नाही. 

अजेयकुमार जाधव 
मो. 09969191363

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad