सोलापूरच्या पाण्यासाठी मंत्रालयासमोर आत्मदहन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 May 2013

सोलापूरच्या पाण्यासाठी मंत्रालयासमोर आत्मदहन


मुंबई : सोलापूरमधील शेतकरी, गरीब जनता, जनावरांना त्वरित पाणी न दिल्यास शेतकर्‍यांसह आपण स्वत: मंत्रालयासमोर आत्मदहन करू. आमच्या मृत्यूला केंद्रीय कृषीमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पाणीपुरवठा मंत्री हे जबाबदार असतील, असा इशारा सोलापूर जिल्हा जनहित शेतकरी संघटनेतर्फे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी दिला आहे. उजनी धरणात पाणी आणून ते उजव्या-डाव्या कालव्यात व आष्टी तलावात सोडावे, या मागणीसाठी प्रभाकर देशमुख यांनी ५ फेब्रुवारीपासून बेमुदत धरणे आंदोलन पुकारले असून शुक्रवारी आंदोलनाचा ८८वा दिवस आहे.

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी शुक्रवारी प्रभाकर देशमुख यांची आझाद मैदानात जाऊन भेट घेतली. पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू व केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची येत्या दोन-तीन दिवसांत आपली भेट घडवून आणण्याचे आश्‍वासन देत आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन ढोबळे यांनी या वेळी केले. दरम्यान, आझाद मैदानात ५ फेब्रुवारीपासून धरणे आंदोलन सुरू केले असून आंदोलनाचा ८८वा दिवस उजाडला तरी सरकार पाणीप्रश्नाबाबत काहीच पावले उचलत नाही. स्वत: मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाणी देण्यासंदर्भात आश्‍वासन देऊनही अद्यापि पाणी सोडण्यात आले नाही.

तथापि, ढोबळे यांनी केंद्रीय कृषीमंत्री, मुख्यमंत्री यांची भेट घडवून आणवी. या बैठकीत जर सोलापूरकरांना उजनीतून नाही तर पुण्यातील अन्य धरणांतून पाणी उपलब्ध करून न दिल्यास आपल्यासह काही कार्यकर्ते मंत्रालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे प्रभाकर देशमुख यांनी सांगितले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांवर शहीद होण्याची वेळ आली व ते शहीद झाले. आज राज्यमंत्र्यांच्या उदासीनतेमुळे आमच्यावर सोलापूरकरांच्या पाणीप्रश्नासाठी आत्मदहन करण्याची वेळ आली आहे, असेही प्रभाकर देशमुख म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad