महाराष्ट्रातील पत्रकारांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी पत्रकार संरक्षण कायदा करावा आणि राज्यातील निवृत्त पत्रकारांसाठी निवृत्ती वेतन योजना सुरू करावी, या मागणीसाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सुमारे ३00 पत्रकारांनी बुधवारी मुंबईतील आझाद मैदानावर धडक दिली. त्या अनुषंगाने पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीतर्फे पनवेल ते आझाद मैदान अशी कारद्वारे महारॅली काढण्यात आली.
या वेळी कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली असता, येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पत्रकार हल्ला विरोधी कायद्याच्या विधेयकासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल सादर करून मंत्रिमंडळ त्यावर सकारात्मक चर्चा करेल. तसेच ज्या राज्यांनी पत्रकारांना पेन्शन योजना राबवली आहे. त्यांच्याकडून माहिती घेऊन महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी पेन्शन योजना राबवण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.
यातील पत्रकारांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा करावा, या मागणीसाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली राज्यातील पत्रकार गेली चार वर्षे सनदशीर मार्गाने लढा देत आहेत. याच मागणीसाठी कृती समितीने मुख्यमंत्र्यांची तब्बल बारा वेळा भेट घेतली असता वेळोवेळी मुख्यमंत्र्यांनी कायदा करण्याबाबत आश्वासनांचे गाजर दाखवले होते, असे समितीचे अध्यक्ष देशमुख यांनी सांगितले. गतवर्षी राज्यात ६४ पत्रकारांवर, तर यावर्षीच्या पहिल्या चार महिन्यांत ३२ पत्रकारांवर हल्ले झाले आहेत, असेही ते म्हणाले.
पत्रकारांच्या या महारॅलीला पळस्पे फाटा-पनवेल येथून सुरू झालेल्या या रॅलीचे पनवेल, कळंबोली, खारघर, कोकण भवन, शिरवणे, वाशी, चेंबूर इत्यादी ठिकाणी स्वागत करण्यात आले. तर मुंबईतील जे.जे. उड्डाणपुलाच्या खालून रॅली नेण्यास पोलिसांनी मज्जाव केल्याने पत्रकारांनी हा मार्ग रोखून धरत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे या मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. रॅली आझाद मैदान येथे पोहचल्यानंतर या महारॅलीची दखल घेऊन राज्याचे गृहमंत्री आर. आर.पाटील आंदोलनाच्या ठिकाणी पोहचले. या वेळी समितीचे अध्यक्ष देशमुख यांनी कृती समितीच्या मागण्यांचे पत्र गृहमंत्र्यांना देऊन पत्रकार हल्ला विरोधी कायदा होण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची विनंती केली.
No comments:
Post a Comment