भारतात ३ लाख बालकांचा पहिल्याच दिवशी मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 May 2013

भारतात ३ लाख बालकांचा पहिल्याच दिवशी मृत्यू


नवी दिल्ली : आर्थिक महासत्ता होण्याची स्वप्ने पाहणार्‍या भारतात जवळपास ३ लाख बालकांचा जन्मानंतर अवघ्या २४ तासांच्या आत मृत्यू होतो, अशी धक्कादायक बाब 'सेव्ह द चिल्ड्रन'च्या वार्षिक अहवालातून पुढे आली आहे. विशेष म्हणजे बालक संगोपनाच्या बाबतीतही भारताला १४२ वा क्रमांक मिळाला असून याबाबतीत पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ या शेजारी राष्ट्रांनीही भारताला पिछाडीवर टाकले आहे.

गेल्या दशकात जगभरात होणार्‍या प्रयत्नांमुळे माता आणि बालकांच्या आरोग्यात मोठी प्रगती झाली असली तरी आजही जगातील १0 लाखांहून जास्त बालके जन्मानंतर पहिल्याच दिवशी मृत्यूच्या जबड्यात जातात. गरीब देशांमध्ये मातांच्या जीवितास मोठा धोका असतो, असे लंडनस्थित 'सेव्ह द चिल्ड्रन' संस्थेने म्हटले आहे. जगातील १८६ देशांतील मातांचे आरोग्य, बालमृत्यूचा दर, शिक्षण आणि उत्पन्नाच्या आधारावर संस्थेने एक अहवाल तयार 
केला असून यात बालक संगोपनात भारताला १४२ वे स्थान मिळाले आहे. तर पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ या देशांना अनुक्रमे १३९, १३६ आणि १२१ वा क्रमांक मिळाला आहे. या क्रमवारीत युरोपीय देश फिनलॅण्ड अव्वल स्थानी असून स्वीडन दुसर्‍या, तर नॉर्वे तिसर्‍या क्रमांकावर आहे. प्रजासत्ताक कांगो या क्रमवारीत शेवटच्या म्हणजे १८६ व्या क्रमांकावर आहे.

भारतातील जवळपास ३ लाख बालकांचा जन्मानंतर पहिल्याच दिवशी म्हणजे २४ तासांच्या आतच मृत्यू होतो. याबाबतीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे, अशी धक्कादायक बाबही या अहवालात नमूद करण्यात आली आहे. नवजात बालकांचा पहिल्याच दिवशी होणार्‍या एकूण मृत्यूंपैकी २९ टक्के मृत्यू एकट्या भारतात होतात. एवढेच नाही, तर प्रसूतीवेळी होणार्‍या माता मृत्यूंमध्येही भारत पहिल्या क्रमांकावर आहे. भारतात दरवर्षी ५६ हजार महिलांचा प्रसूतीवेळी मृत्यू होतो, असेही या अहवालात म्हटले आहे.

भारताने गेल्या काही वर्षांत शानदार आर्थिक विकास साध्य केला असला तरी त्याचा लाभ समाजातील तळागाळापर्यंत पोहोचला नाही, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. गर्भधारणेचा कालावधी, बाळंतपणात होणारा मृत्यू, ५ वर्षांखालील बालमृत्यू आणि शाळेत घालण्यात आलेल्या वर्षांच्या आधारावर 'सेव्ह द चिल्ड्रन'ने जगभरातील देशांची क्रमवारी निश्‍चित केली आहे. बालमृत्यूच्या बाबतीत विकसित देशांच्या यादीत अमेरिका अव्वल स्थानी आहे. येथे दरवर्षी ११ हजार ३00 नवजात बालकांचा मृत्यू होतो, असे अहवाल सांगतो.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad