मुंबई - तिसरी आघाडी स्थापन करून सत्ताधारी कॉंग्रेस आघाडी व विरोधकांच्या आघाडीविरुद्ध लढण्याचा निर्णय भारिप बहुजन महासंघाने घेतला आहे. यासंदर्भात समविचारी पक्षांसोबत चर्चा व बैठका सुरू असल्याची माहिती भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
कॉंग्रेससोबत आघाडी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी वर्षभरापूर्वी चर्चा झाली होती. मात्र त्यावेळी चर्चा पुढे गेली नव्हती. सध्या कॉंग्रेससोबत जाण्याचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तिसरी आघाडी स्थापन करण्यासंदर्भात बैठकांना सुरुवात झाली की तिसऱ्या आघाडीतील पक्षांसदर्भात दिशाभूल करणाऱ्या बातम्या यायला सुरुवात होते, असा आरोप त्यांनी केला. गेल्या विधानसभा निवडणुकांवेळी "रिडालोस' ची निर्मिती करण्यात आली होती व त्यामध्ये सर्वात मोठ्या पक्षाची भूमिका रामदास आठवलेंच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाची होती. मात्र विधानसभा निवडणुकांमध्ये अपेक्षित यश मिळू न शकल्याने आठवलेंनी महायुतीचा मार्ग स्वीकारला. आता प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील भारिप बहुजन महासंघ भाकप, माकप, शेकाप व इतर समविचारी पक्षांना सोबत घेऊन तिसरी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
सध्या भारिप बहुजन महासंघाचे अकोला जिल्ह्यात दोन आमदार आहेत, अकोला महापालिकेवर पक्षाची सत्ता आहे व अकोला जिल्ह्यातील सात पंचायत समितीवर सत्ता आहे त्यामुळे अकोला जिल्ह्यात पक्ष प्रबळ आहे. अशीच कामगिरी राज्यभरात करण्यासाठी पक्ष प्रयत्नशील असून समविचारी पक्षांच्या सहाय्याने आगामी निवडणुकीत चांगले यश मिळेल, असा विश्वास आंबेडकर यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment