मुंबई : पूर्वी वृत्तपत्रात नाव येण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागायची. एका ओळीची आपल्या नावाची बातमी झाली तर खूप आनंद व्हायचा. मात्र आज सकाळी उठल्याबरोबर वृत्तपत्रात आपले नाव नसेल तर दिवस खूप छान जातो, असे सांगत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाबरोबर आता सोशल मीडियाचीही भीती वाटू लागली आहे. त्यामुळे 'इम्पॅक्ट' करताना तो काळजीपूर्वक करावा, असा सल्लाही त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिला.
पुढारीकार पद्मश्री कै. ग. गो जाधव सन्मान पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर यांना मुंबई मराठी पत्रकार संघ येथे थोरात यांच्या हस्ते देण्यात आला. त्या वेळी महसूलमंत्री थोरात बोलत होते. या वेळी थोरात म्हणाले, पूर्वी भाषण करताना मजा असायची. आता समोर कॅमेरा असल्यामुळे भाषणाची मजाच गेली. प्रेक्षक हसले की समजायचे आपल्यासाठी खड्डा खोदला गेला आहे. अरुण टिकेकर यांच्याबद्दल बोलताना थोरात म्हणाले, वृत्तपत्रसृष्टीमध्ये दादा असणारे टिकेकर यांच्याबरोबर मला मुंबई समजावून घ्यायची आहे. त्यांचा अनुभव महाराष्ट्राला देशाला मागदर्शक ठरणारा आहे. सध्या आवृत्त्यांच्या काळात शेजारील तालुक्याची लाखांची सभा शेजारच्या तालुक्याला माहिती नसते. मात्र आतील पानाची ताकद इलेक्ट्रॉनिक मीडियापेक्षा मोठी आहे, असे कौतुक करत प्रिंट मीडियाने वेगाच्या ओघात काळजीपूर्वक इम्पॅक्ट करावा अशी अपेक्षाही व्यक्त केली. सत्काराला उत्तर देताना टिकेकर म्हणाले, प्रिंट मीडियाबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडिया विश्वासार्हता गमावून बसला आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियाने आपली चौकट आखावी नाही तर ती सरकारला आखावी लागेल. संपादकावरील मालकांचा विश्वास आता उडायला लागला आहे. संपादक रोज परिषदेला बसतो. त्याला आज जेवढे ज्ञान आहे, तेवढे ज्ञान वाचकाला आले आहे. विरोधी पक्षाचे काम वृत्तपत्राकडे असायला हवे, याचे भान हल्ली राहिले नाही. सभ्यता न सोडता कडक लिहिता आले पाहिजे. पत्रकारिता करताना लागलेली आग विझवण्याचे काम झाले पाहिजे, भडकवण्याचे नाही. वाचकांना विचार करायला लावणारी पत्रकारिता झाली पाहिजे. प्रिंट मीडियाची आता इलेक्ट्रॉनिक मीडियाशी स्पर्धा आहे. प्रिंटने आता स्थानिक प्रश्न हाती घेण्याची गरज आहे. मालक, लोकप्रतिनिधी, वाचक, जाहिरातदार यांचा दबाव गट संपादकाला सांभळावा लागतो.
No comments:
Post a Comment