मुंबई : शासकीय नोकर्यांमधील अल्पसंख्याक मुस्लीम समाजाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. हे प्रमाण वाढवण्यासाठी मुस्लिमांनी स्पर्धा परीक्षांमध्ये अत्यावश्यक असलेली मराठी भाषा चांगल्या पद्धतीने अवगत करणे गरजचे आहे, असे प्रतिपादन राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मुनाफ हकीम यांनी केले.
मलबार हिल येथील सह्याद्री राज्य अतिथीगृहात शनिवारी याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते. राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत राज्यात १ ते १५ मे दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विक्रीकर उपायुक्त हाजी सैपन जतकर, ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी, अँड़ इंद्रपाल सिंग, मुबारक खान, निजामुद्दीन राईन, सीता वाघ यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आदी क्षेत्रातील अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते. राज्याची व्यवहाराची, शासकीय कामकाजाची, पत्रव्यवहाराची तसेच पोलीस ठाणे, न्यायालये आदी ठिकाणच्या कामकाजाची भाषा प्रामुख्याने मराठी आहे. अल्पसंख्याक समाजातील अनेकांना मराठी अवगत नसल्याने या सर्वच ठिकाणी त्यांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे इथल्या व्यवस्थेत आपली बाजू भक्कमपणे मांडण्याच्या उद्देशाने प्रत्येक अल्पसंख्याक नागरिकाने मराठी भाषा अवगत करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
शासकीय सेवांमध्ये मुस्लिमांचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याचे सच्चर समितीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. आपल्या राज्यातील बर्याच मुस्लीम नागरिकांनी मराठी भाषेपासून अंतर ठेवल्याचा हा परिणाम असल्याचे ते म्हणाले. शहरी भागातील तसेच उर्दू माध्यमात शिकणार्या मुस्लीम विद्यार्थ्यांनी मराठी भाषा गंभीरपणे शिकावी, असे आवाहन त्यांनी केले.
No comments:
Post a Comment