'कॅग' आपला अहवाल लिक करत नाही - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 May 2013

'कॅग' आपला अहवाल लिक करत नाही

स्थानिक स्वराज्य संस्थांचे 'कॅग'कडून लेखापरीक्षण व्हावे - 'कॅग' प्रमुख विनोद राय
नवी दिल्ली : टू-जी स्पेक्ट्रम आणि कोळसा खाण वाटपाशी संबंधित वादग्रस्त लेखापरीक्षण अहवाल लिक होण्यामागे आपली कोणतीही भूमिका नाही. 'कॅग'आपला अहवाल लिक करत नाही, अशी स्पष्टोक्ती भारताचे नियंत्रक तथा लेखापरीक्षक (कॅग) विनोद राय यांनी मंगळवारी दिली. राय बुधवारी आपल्या पदावरून सेवानवृत्त होणार असून त्या पार्श्‍वभूमीवर वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही स्पष्टोक्ती दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजाचेही 'कॅग'च्या माध्यमातून लेखापरीक्षण व्हावे, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.

लेखापरीक्षण प्रक्रियेच्या कालावधीत कुणी माहिती अधिकारांतर्गत एखादा प्रश्न विचारला, तर केंद्रीय माहिती आयोगाच्या आदेशानुसार आम्हाला त्याचे उत्तर देणे बंधनकारक आहे. असे करणे अहवाल लिक करणे होत नाही, असे राय म्हणाले. कॅगचा अहवाल संसदेच्या पटलावर ठेवण्याअगोदर कुणालाही दाखवला जाऊ नये, असे आपले स्पष्ट मत आहे. यासंबंधी आपण पंतप्रधानांनाही पत्र लिहिले होते. मात्र त्यांनी ते कायदा मंत्रालयाकडे सरकवले. आम्ही या मुद्दय़ावर अर्थमंत्री, संसदीय कामकाजमंत्री आणि लोकसभा अध्यक्षांशीही चर्चा केली. मात्र या सर्वांनी हा मुद्दा संसदेच्या विशेषाधिकारांच्या उल्लंघनात येत नसल्याचे सांगितले. त्यामुळेच आम्ही 'आरटीआय'अंतर्गत माहिती देणे सुरू ठेवले आहे, असे राय म्हणाले.

लोकलेखा समिती, सरकार आणि 'कॅग'मध्ये झालेल्या त्रिपक्षीय चर्चेनंतर ठरविण्यात आलेल्या माध्यम धोरणाचे आपण काटेकोर पालन करत असल्याचेही या वेळी 'कॅग'प्रमुखांनी स्पष्ट केले. संसदेत अहवाल सादर झाल्यानंतर 'कॅग' पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या अहवालाची माहिती देतो. कोळसा खाणवाटप आणि टू-जी स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्याचा 'कॅग'चा अहवाल संसदेत मांडण्याअगोदरच माध्यमांत लिक झाला होता. यामुळे मोठा गदारोळ निर्माण झाला होता. तसेच सरकारनेही लिक होणार्‍या अहवालावरून 'कॅग'वर दबाव वाढवला होता. अशा संकट काळातही आपल्या मनात राजीनामा देण्याचा विचार आला नाही, असे ते म्हणाले. सरकारी धोरणांचे गुणगान करण्याचे आमचे काम नाही तर लेखापरीक्षणाच्या माध्यमातून सरकारी कामकाजाची चिरफाड करणे हे आमचे काम आहे, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. दरम्यान, सार्वजनिक-खाजगी भागीदारीच्या सर्व योजना, स्थानिक स्वराज्य संस्था आणि समित्यांचेही 'कॅग'च्या माध्यमातून लेखापरीक्षण व्हावे, अशी मागणीही मावळत्या 'कॅग'प्रमुखांनी केली आहे. बुधवारी निवृत्त होणार्‍या राय यांनी  निवृत्तीनंतर आपला राजकारणात येण्याचा कोणताही हेतू नसल्याचेही या वेळी स्पष्ट केले.
     

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad