मुंबई: वरळी येथील लव्हग्रोव्ह आणि क्लिव्हलँड उदंचन केंद्र उभारणीची कामे अत्यंत संथगतीने करणार्या ठेकेदार मेसर्स युनिटी -एम. अँण्ड पी.डब्लू.पी.के.कन्सोर्टियम कंत्रादाराची प्रशासनाने नोंदणी रद्द करावी, असे स्पष्ट निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी दिले आहेत.
लव्हग्रोव्ह आणि क्लिव्हलँड बंदर मलनि:सारण उदंचन केंद्र या दोन्ही प्रकल्पांच्या कामांचे कार्यादेश २३ नोव्हेंबर २0११ रोजी देण्यात आले आहे. १५ महिने मुदतीची कामे पावसाळा वगळता ५ ऑक्टोबर २0१३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र लव्हग्रोव्ह उदंचन केंद्राचे आतापर्यंत केवळ ३५ टक्के आणि क्लिव्हलँड केंद्राचे अवघे ५ टक्के काम ठेकेदराने पूर्ण केले आहे. अतिशय संथगतीने सुरू असणार्या या कामाबद्दल ठेकेदारास पालिका प्रशासनाने यापूर्वीच वारंवार कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच लव्हग्रोव्ह उदंचन केंद्राच्या कामाबाबत सुमारे १0 लाख रुपयांचा, तर क्लिव्हलँड उदंचन केंद्राच्या कामकाजाबाबत सुमारे १९ लाख रुपयांचा दंडदेखील ठोठावण्यात आला आहे. मात्र दोन्ही कामांमध्ये अपेक्षित वेग येत नसल्याने ठेकेदार मेसर्स युनिटी - एम. अँण्ड पी.डब्लू.पी.के.कन्सोर्टियमची नोंदणी रद्द करून त्यास काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश शेवाळे यांनी दिले आहेत.
No comments:
Post a Comment