उल्हासनगर : भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जाहीर सभेत उल्हासनगर शहराचे उपमहापौर जमनु पुरस्वानी यांनी आपल्या पायात बूट घालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण केला. या प्रकाराने संतप्त झालेल्या भीमसैनिकांनी रिपाइं जिल्हाध्यक्ष नाना बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी सकाळी उपमहापौरांचे जनसंपर्क कार्यालय गाठून त्यांना जाब विचारला. या वेळी उपमहापौरांनी घडलेल्या प्रकाराबाबत माफी मागितली, मात्र संतप्त झालेल्या भीमसैनिकांनी पुरस्वानी यांच्या कार्यालयावर हल्लाबोल करत त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली.
रविवारी उल्हासनगरात आमदार कुमार आयलानी यांच्या निधीतून करण्यात आलेल्या विकासकामांचा उद््घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते व खासदार गोपीनाथ मुंडे, राष्ट्रीय सचिव पूनम महाजन, माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. दरम्यान, उद्घाटन समारंभ पार पडल्यानंतर असलेल्या जाहीर सभेच्या वेळी उल्हासनगर शहराचे उपमहापौर जमनु पुरस्वानी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. या वेळी त्यांनी आपल्या पायात बूट घातले होते. दरम्यान, महामानवांचा अपमान सहन न झाल्याने मंगळवारी सकाळच्या सुमारास रिपाइं जिल्हाध्यक्ष नाना बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो भीमसैनिकांनी उपमहापौर जमनु पुरस्वानी यांचे जनसंपर्क कार्यालय गाठले व त्यांना घडलेल्या प्रकाराविषयी जाब विचारला. झालेल्या प्रकाराबाबत उपमहापौरांनी भीमसैनिकांची जाहीर माफी मागून हा प्रकार अनावधानाने झाला असल्याचे सांगितले, मात्र संतप्त भीमसैनिकांनी उपमहापौर पुरस्वानी यांच्या जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड केली. या वेळी नाना बागुल यांनी संतप्त जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला.
महामानवांचा अपमान कदापि सहन करणार नाही - नाना बागुल
उल्हासनगर महापालिकेत शिवसेना, भाजपा, रिपाइं, साई पक्षाच्या महायुतीची सत्ता असली तरीदेखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज या महामानवांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही. उपमहापौर जमनु पुरस्वानी यांनी जाहीर माफी न मागितल्यास महापालिकेच्या सभागृहात आमचे भीमसैनिक त्यांना व्यासपीठावरून खाली खेचणार, असा इशारा त्यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment