लोकसंख्येत महाराष्ट्र दुसरा......!!!! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 May 2013

लोकसंख्येत महाराष्ट्र दुसरा......!!!!

देशात लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र दुस - या क्रमांकाचे राज्य असल्याचे सन २०११ च्या जनगणनेच्या संक्षिप्त प्राथमिक माहितीतून स्पष्ट झाले आहे. राज्याची लोकसंख्या ११ कोटी २३ लाख ७४ हजार ३३३ असून गेल्या दहा वर्षांत राज्याच्या लोकसंख्येत १ कोटी ५४ लाख ९५ हजार ७०६ इतकी, म्हणजे १५.९९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बाँठिया यांच्या हस्ते हा संक्षिप्त अहवाल प्रकाशित झाला. 

राज्यात सर्वाधिक लोकसंख्या ठाणे जिल्ह्याची तर सर्वात कमी लोकसंख्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची आहे. ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या १ कोटी १० लाख ६० हजार १४८ असून ती राज्याच्या लोकसंख्येच्या ९.८४ टक्के आहे. ठाण्यानंतर पुणे आणि मुंबई उपनगर हे जास्त लोकसंख्येचे जिल्हे आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या ८ लाख ४९ हजार ६५१ असून राज्याच्या लोकसंख्येच्या ०.७६ टक्के आहे. राज्याची शहरी लोकसंख्या ४२.४ टक्क्यांवरून ४५.२ टक्के वाढली आहे. २००१ ते २०११ या कालावधीतील राज्याची लोकसंख्यावाढ १५.९९ टक्के असली तरी १९९१ ते २००१ या कालावधीतील लोकसंख्यावाढीशी तुलना करता लोकसंख्यावाढीचा दर ६.७४ टक्क्यांनी कमी झाला आहे.

राज्याच्या लोकसंख्येत ५ कोटी ८२ लाख ४३ हजार ०५६ पुरुष, तर ५ कोटी ४१ लाख ३१ हजार २७७ महिला आहेत. २०११ च्या जनगणनेमध्ये ७८ लाख ४२ हजार ४६० पुरुषांची (१५.५६ टक्के), तर ७६ लाख ५३ हजार २४६ महिलांची (१६.४७ टक्के) वाढ झाली आहे. यामुळे दर हजारी मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या ९२९ इतकी असून ० ते ६ वयोगटातील दर हजारी मुलांच्या तुलनेत ८९४ इतकी मुलींची संख्या आहे.

राज्यात शिक्षणाचे प्रमाण ८२.३४ टक्के आहे. देशातील शिक्षणाचे प्रमाण ७२.९९ टक्के आहे. म्हणजेच, देशाच्या तुलनेत महाराष्ट्रातील शिक्षणाचे प्रमाण जास्त आहे. राज्यात पुरुषांचे शिक्षणाचे प्रमाण २.४१ टक्क्यांनी वाढले, तर महिलांचे ८.८४ टक्क्यांनी वाढले.

राज्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या १ कोटी ३२ लाख ७५ हजार ८९८ असून मागील जनगणनेच्या आकडेवारीच्या तुलनेत त्यात ३३ लाख ९४ हजार २४२ इतकी वाढ झाली. राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ती १०.२० टक्क्यांवरून ११.८१ टक्के झाली. राज्यातील सर्वात जास्त अनुसूचित जातीची लोकसंख्या अकोला जिल्ह्यात आहे. अनुसूचित जमातीची लोकसंख्या १ कोटी ०५ लाख १० हजार २१३ असून राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ८.८५ टक्क्यांवरून ९.३५ टक्के इतकी वाढली आहे. नंदूरबार जिल्हा सर्वात जास्त अनुसूचित जमातीची लोकसंख्या असलेला जिल्हा आहे.

राज्यात २०११ च्या जनगणनेनुसार ४ कोटी ९४ लाख २७ हजार ८७८ कामगार असून २००१ च्या जनगणनेच्या तुलनेत कामगारांची संख्या ४२.५० टक्क्यांवरून ४३. ९९ टक्के झाली आहे. ही वाढ १.४९ टक्के आहे..

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad