रेसकोर्सला मुदतवाढ देण्यात यावी - अजित पवार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 May 2013

रेसकोर्सला मुदतवाढ देण्यात यावी - अजित पवार

मुंबई : महालक्ष्मी रेसकोर्सची सहा लाख चौरस मीटर जागा राज्य शासनाच्या मालकीची असून भाडेपट्टय़ाची मुदत ३१ मे रोजी संपत असली तरी रेसकोर्सला मुदतवाढ देण्यात यावी, असे आपले व्यक्तिगत मत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी स्पष्ट केले. मात्र भाडेपट्टा वाढवून देताना तेथे कुठलेही बांधकाम करता येणार नाही, अशी अट घातली जावी, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

महालक्ष्मी रेसकोर्सचा भाडेपट्टा ३१ मे रोजी संपत असून त्यांना मुदतवाढ देऊ नये त्याऐवजी तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान करण्यात यावे, अशी मागणी महापौर सुनील प्रभू यांनी केली आहे. रेसकोर्सच्या जागेवर विस्तीर्ण उद्यान उभारून त्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा शिवसेनेचा विचार आहे. यावरून वादविवाद सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सध्याची स्थिती कायम ठेवून रेसकोर्ससाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी भूमिका घेतली. मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना पवार यांनी शहरात वर्षानुवष्रे सुरू असणार्‍या गोष्टी कायम राहिल्या पाहिजेत, असे आपले मत असल्याचे सांगितले.बंगलोर, पुणे आदी शहरांतही असेच रेसकोर्स आहेत तेथे जाणारा एक वर्ग आहे.महालक्ष्मी रेसकोर्स साडेआठ लाख चौरस मीटर जागेवर उभे असून त्यातील अडीच लाख चौरस मीटर जागा महापालिकेच्या, तर सहा लाख चौरस मीटर जागा राज्य सरकारच्या मालकीची आहे. उद्या तेथे उद्यान होईल नंतर आणखी काही होईल.मुंबईत दुसरी एवढी मोठी जागा उपलब्ध होऊ शकत नाही. शिवाय रेसकोर्सच्या जागेचा अन्य मोठय़ा कार्यक्रमांसाठीही उपयोग होतो. त्यामुळे तेथे रेसकोर्स कायम ठेवावे व महापालिका आणि सरकारच्या परवानगीशिवाय तेथे कोणतेही नवीन बांधकाम करता येणार नाही, या अटीवर भाडेपट्टा वाढवून द्यावा, असे मत व्यक्त करतानाच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले.


टाळीचा विषय संपला
मनसेला महायुतीत समाविष्ट करण्यासंदर्भात भाजपा आणि आठवले गटाकडून सध्या प्रयत्न सुरू आहेत. याकडे उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले असता, आता टाळीचा विषय संपला आहे. माझी भूमिका दै. 'सामना'मधून मांडलेली असून तीच कायम असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

रेसकोर्स मैदान सर्वसामान्यांसाठी सोडा
औरंगाबाद : मुंबईतील रेसकोर्स मैदान सर्वसामान्यांसाठी सोडा, ही भूमिका मांडतानाच मुंबईबाहेरही रेसकोर्स करता येईल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी औरंगाबादेत स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबई महानगरपालिकेने रेसकोर्सच्या जागेवर उद्यान करण्याचा ठराव मंजूर केला आहे. या मंजूर ठरावाला न मोजण्याची भाषा सध्या सुरू आहे. असा प्रकार झाला तर जनता तुम्हालाही मोजणार नाही एवढे लक्षात ठेवा. रेसकोर्सवर कोणाचे घोडे पळतात, घोडेवाले कोणाचे मित्र आहेत हे मलाही माहिती आहे. नागरिकांच्या आनंदासाठी, समाधानासाठी किमान रेसकोर्सची जागा उद्यानासाठी सोडावी. आयपीएलमध्ये मलिदा न मिळाल्यामुळेच केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्याकडून यासंदर्भात गृहखात्याकडून चौकशी करावी, असा सूर काढण्यात येत आहे. दुष्काळग्रस्तांसाठी पोटतिडकीने बोलत असल्याचे दाखविणार्‍यांनी या भागात साधा पाहणी दौराही केला नाही, असा टोमणाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad