मातंग समाजाचे बेमुदत धरणे आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 May 2013

मातंग समाजाचे बेमुदत धरणे आंदोलन

मुंबई : मागासवर्गीय मातंग समाजाला आठ टक्के आरक्षण मिळावे, यासाठी अखिल भारतीय मातंग संघाच्या वतीने संघाचे संस्थापक बाबासाहेब गोपले यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मातंग समाजाला आठ टक्के आरक्षण देण्याचे तत्त्वत: मान्य केले होते. 

त्याबाबत पुढे काहीच झाले नाही. याबाबत तत्काळ बैठक घेऊन केंद्र सरकारकडे याबाबतचा अहवाल पाठवावा. मातंग समाज संशोधन समिती शासनाने स्थापन करावी आणि समितीच्या अध्यक्षांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा देण्यात यावा. मुंबईत संत रोहिदास महाराज आणि साहित्यर▪अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य भवनाचे उच्च आणि उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम शासनाने करून द्यावे. अनुसूचित जातीचे अ, ब, क, ड असे वर्गीकरण करण्यात यावे. महाराष्ट्रीय ख्रिश्‍चनांना सर्व क्षेत्रात सवलती देण्यात याव्यात. माटुंगा रेल्वे स्टेशनला मातंग रेल्वे स्टेशन असे नाव द्यावे. शासकीय मागासवर्गीय मुलींच्या सर्व विभागीय वसतिगृहांना ज्ञानज्योती मुक्ता साळवे यांचे नाव देण्यात यावे. दलितमित्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार आणि अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त असलेल्यांना दरमहा सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे. या आणि इतर २६ मागण्या शासनाने त्वरित मान्य कराव्या; अन्यथा हे बेमुदत धरणे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा कुसूमताई गोपले यांनी या वेळी दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad