व्यापाऱ्यांकडून राष्ट्रगीताचा अवमान / पोलिस, पत्रकारांना शिव्या - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 May 2013

व्यापाऱ्यांकडून राष्ट्रगीताचा अवमान / पोलिस, पत्रकारांना शिव्या


मुंबई - अजेयकुमार जाधव 

एलबीटी नको अशी मागणी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी जेलभरोच्या नावाखाली छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरातील रस्त्यावर उतरून तीन तास रस्तारोको केला. यावेळी बेभान झालेल्या व्यापाऱ्यांनी विभस्त असे नृत्य करत राष्ट्रगीत म्हणण्याचा प्रकार केला. पोलिसांनी राष्ट्रगीत बोलताना असे विभस्त असे नृत्य केल्याने राष्ट्रगीताचा अवमान होतो असे सांगूनही बेभान झालेले व्यापारी काहीही ऐकण्यास तयार नव्हते. 


पोलिसांच्या भावना दुखावल्या कशा जातील पोलिसांच्या भावना दुखावल्यावर पोलिस लाठीचार्ज करतील व व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला बळकटी येईल म्हणून सतत पोलिसांच्या विरोधात शिव्या व अपशब्द वापरून पोलिसांना टार्गेट केले जात होते. पत्रकारानाही मुख्यमंत्र्यांचा कुत्रा आजारी पडला आहे त्याच्या बातम्या आणि छायाचित्र छापा तुम्हाला जास्त पैसे मिळतील असे उद्गार सतत काढून पत्रकारांना वृत्तसंकलन करताना अडथळे आणले जात होते. 


मुंबईत एलबीटी लागू करण्याचा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी आझाद मैदान ते छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरात जेल भरो आणि रास्ता रोको आंदोलन करणार्‍या व्यापार्‍यांवर आज पोलिसांनी लाठीमार केला.  भाजप नेते गोपीनाथ मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, ‘फाम’चे अध्यक्ष मोहन गुरनानी, समाजवादी पार्टीचे नेते, आमदार अबू आझमी, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह हजारो भाजप कार्यकर्ते आणि व्यापार्‍यांनी स्वत:ला अटक करवून घेत जेल भरो केले.

भाजप आणि फाम या व्यापार्‍यांच्या संघटनेने आज एलबीटीविरोधात जेल भरो आंदोलन पुकारले. दुपारी १२.३० वाजता हजारो व्यापारी आणि भाजप कार्यकर्ते असे सुमारे पाच हजार आंदोलक आझाद मैदानात जमले. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारच्या निषेधाच्या घोषणा केल्या. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी विनोद तावडे, किरीट सोमय्या, आमदार गोपाळ शेट्टी, योगेश सागर, ‘फाम’चे मोहन गुरनानी, सपा नेते अबू आझमी आणि भाजपा मुंबई अध्यक्ष राज पुरोहित घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे आंदोलकांना आणखीनच स्फुरण चढले. ‘एलबीटी हटाव’च्या घोषणेने पुन्हा संपूर्ण आझाद मैदान दणाणून गेले. त्यानंतर आझाद मैदानात सभा झाली. यावेळी ३०० पोलीस आणि १६ वायरलेस व्हॅन तैनात करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मुंडे, गुरनानी, आझमी यांच्यासह सर्व नेते, कार्यकर्ते आणि व्यापार्‍यांनी जेल भरो केले. जेल भरो करण्यासाठी व्यापारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती.

फोटोग्राफरला मारहाण... कृष्णप्रकाश यांची माफी
पोलिसांचा लाठीमार सुरू असतानाच या आंदोलनाचे फोटो काढणार्‍या फोटोग्राफरलाही पोलिसांचा मार बसला. पत्रकारांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर कृष्णप्रकाश यांनी फोटोग्राफरची विचारपूस करून त्याची माफी मागितली. दरम्यान, राष्ट्रगीत सुरू असताना व्यापार्‍यांनी भान सोडले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad