मुंबई - बार्गेनिंग पॉवर दाखवून मुंबई महानगरपालिकेची आरोग्य समिती पदरात पाडून घेतल्यावर अखिल भारतीय सेनेने आता रुग्णालयांच्या औषधखरेदी आणि यंत्रसामग्रीचे प्रस्ताव आरोग्य समितीत सादर करण्याचा ठरावच अभासेने मांडल्यामुळे शिवसेनेचे कोंडी झाली आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर सर्व अपक्ष नगरसेवक आपल्या बाजूला वळवल्यानंतरही अभासेला आरोग्य समिती अध्यक्षासारखे महत्त्वाचे पद शिवसेनेला द्यावे लागले होते. 2007 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतरही अभासेने शिवसेनेला पाठिंबा दिला होता; मात्र त्यावेळी दोन्ही सदस्य स्थायी आणि सुधार समितीच्या बैठकांमध्ये फक्त हजेरी लावत होते. मात्र आता आरोग्य समितीचे अध्यक्षपद हाती आल्यावर अभासेनेही शिवसेनेला धक्के देण्यास सुरुवात केली आहे. पालिकेच्या रुग्णालयात लागणाऱ्या औषधांचे आणि यंत्रसामग्रीचे प्रस्ताव थेट स्थायी समितीत मंजुरीसाठी येत होते. मात्र आरोग्य समितीला विशेष अधिकार असल्याने हे प्रस्ताव आरोग्य समितीत सादर करण्याची ठरावाची सूचना अध्यक्षा गीता गवळी यांनी मांडली आहे.
औषध आणि यंत्रसामग्रीचे प्रस्ताव आरोग्य समितीत सादर झाल्यास रुग्णांसाठी कोणती उपकरणे आणि औषधे उपलब्ध आहेत त्याची माहिती मिळून आवश्यकतेनुसार नव्या औषधांची खरेदी आणि यंत्रासामग्री विकत घेता येऊ शकेल, असे या ठरावात नमूद केले आहे. मात्र यातून अभासेने शिवसेनेला धक्का दिला असल्याचे मानले जात आहे. ही ठरावाची सूचना या महिन्याच्या महासभेत मंजुरीसाठी येणार आहे. या सूचनेत प्रशासनाने हे प्रस्ताव आरोग्य समितीला सादर करण्याचा निर्णय घेतल्यास अभासेची बार्गेनिंग पॉवर अधिक वाढेल.
No comments:
Post a Comment