ठाकरे यांच्या अंत्यविधीच्या खर्चाचा 5 लाखांचा धनादेश लटकला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 May 2013

ठाकरे यांच्या अंत्यविधीच्या खर्चाचा 5 लाखांचा धनादेश लटकला

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यविधीच्या खर्चापोटी शिवसेनेने गुरुवारी पाच लाखांचा चेक चुकता करून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु ‘त्या भरपाईची आपल्याला कल्पना नाही’, असे सांगत पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत अंत्यविधीच्या खर्चाचा प्रस्ताव मंजूर करण्यास शिवसेनेला भाग पाडले.

बाळासाहेबांच्या अंत्यविधीला शिवाजी पार्कवर दहा लाख लोक जमतील, असा पोलिसांचा अंदाज होता. चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाने मैदानावर एलसीडी आणि सीसीटीव्ही लावले होते. त्यासाठी पाच लाखांचे कंत्राटही देण्यात आले होते. कार्योत्तर मंजुरीसाठी तो प्रस्ताव शुक्रवारी स्थायी समितीत सादर होणार होता. मात्र, अंत्यविधीचा खर्च जनतेच्या पैशातून करू नये, अशी भूमिका ‘मनसे’ने घेतली होती. हा वाद वाढू नये, यासाठी उद्धव ठाकरे यांनी पाच लाखांचा धनादेश गुरुवारी पालिकेला दिला. त्यामुळे खर्चाचा प्रस्ताव पालिकेने मागे घेणे अपेक्षित होते, परंतु प्रशासनाने तो प्रस्ताव आज मंजुरीसाठी आणला. तेव्हा शिवसेनेने अंत्यविधीच्या खर्चाची भरपाई केली आहे. त्याबाबत आयुक्तांनी खुलासा करावा, अशी सूचना स्थायी अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी केली. मात्र, चेकबाबत कल्पना नाही, असे उत्तर अतिरिक्त आयुक्त मनीष म्हैसकर यांनी दिले. आयुक्तांच्या या उत्तरावर स्थायीमधील शिवसेना सदस्य गोंधळून गेले. या वेळी बाळासाहेबांच्या अत्यंविधीच्या खर्चाबाबत आम्हाला वाद घालायचा नाही, अशी भूमिका विरोधकांनी घेतली. अखेर त्या खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याशिवाय सत्ताधारी युतीकडे पर्याय राहिला नाही.

त्या चेकचे काय?
अंत्यविधीच्या खर्चाच्या भरपाईपोटी शिवसेनेने पाच लाखांचा धनादेश पालिकेला दिला आहे. पालिकेच्या स्थायी समितीमध्येही पुन्हा त्याच खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेचा चेक पालिका वटवणार की परत देणार याबाबत अनिश्चितता आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad