पालिका शाळांमध्ये खासगी संस्थांची दुकानदारी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 April 2013

पालिका शाळांमध्ये खासगी संस्थांची दुकानदारी


मुंबई - मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये खासगी संस्थांची दुकानदारी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. राजकीय पक्षांच्या दबावामुळे तब्बल 1 हजार 819 खोल्या या संस्थांच्या ताब्यात असून, 250 ते 500 रुपये नाममात्र भाडे भरून या संस्था लाखो रुपयांची कमाई करीत आहेत. 

पालिकेच्या अनेक शाळा आणि वर्गखोल्या खासगी संस्थांना भाड्याने दिल्या आहेत. यात सामाजिक संघटना, कामगार संघटना; तसेच खासगी अभ्यासक्रमांसाठी आजवर 1 हजार 819 खोल्या भाड्याने दिल्या आहेत. या सर्वांकडून 250 ते 500 मासिक भाडे घेतले जाते; मात्र नृत्य, चित्रकला, शिवणकाम आणि संगीत असे वर्ग घेणाऱ्या संस्था विद्यार्थ्यांकडून हजारो रुपयांचे शुल्क वसूल करतात. या खोल्या पालिकेने परत घ्याव्यात, अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली आहे; परंतु प्रशासन मेहेरबान असल्याने या संस्थांची दुकाने सुरूच आहेत. 

पालिकेने सध्या खोल्या भाड्याने देण्याच्या धोरणाला स्थगिती दिली आहे. नवे धोरण ठरविण्यात येत आहे. गेली अनेक वर्षे हेच उत्तर प्रशासनाकडून मिळत आहे. तोपर्यंत नाममात्र भाड्यांवर या संस्थांनी मोक्‍याच्या ठिकाणच्या शाळांमधील वर्गखोल्यांमध्ये ताबा मिळविला आहे. 

पालिकेने अशैक्षणिक वापरासाठी दिलेल्या 1191 खोल्या दिल्या असून सामाजिक संघटना आणि कामगार संघटनांना 628 खोल्या दिलेल्या आहेत.  
भाड्याने दिलेले वर्ग 
राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळा - 712 
सीबीएसी - 9 
आयसीएससी - 67 
आयबी - 48 
शिवउद्योग सेना, मुंबई शिक्षण सेना, अल्कोहोलिक ऍनानिमस, म्युनिसिपल कामगार सेना, नंदी फाऊंडेशन, प्रजा फाऊंडेशन, डिग्निटी फाऊंडेशन या संस्थाना वर्ग खोल्या भाड्याने देण्यात आल्या आहेत. 

'वर्ग परत घ्या' -शिक्षण समिती अध्यक्ष
गोरगरीब विद्यार्थ्यांचा या वर्गावर सर्वप्रथम अधिकार आहे. नाममात्र भाड्याने या संस्थांना खोल्या देऊन पालिका विद्यार्थ्यांवर अन्याय करीत आहे. यामुळे हे वर्ग पालिकेने तत्काळ परत घ्यावेत, अशी मागणी करीत तसे पत्र शिक्षण समिती अध्यक्ष मनोज कोटक यांनी अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी यांना पाठविले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad