दगड मातीच्या स्मारकापेक्षा विचारांचा प्रसार करणे गरजेचे - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 April 2013

दगड मातीच्या स्मारकापेक्षा विचारांचा प्रसार करणे गरजेचे - मुख्यमंत्री


मुंबई / अजेयकुमार जाधव - 
दगड मातीच्या स्मारकापेक्षा बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार, प्रसार आणि आचरण करणे गरजेचे असल्याचे सांगून बाबासाहेबांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोचविण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 122व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी स्मारक टपाल तिकिटाचे प्रकाशन राज्यपाल के. शंकरनारायणन आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेचे शिल्पकार म्हणून राज्यघटनेच्या माध्यमातून देशाला दिशा आणि संपूर्ण जगाला समतेचा संदेश दिला. देशात समता प्रस्थापित होण्यासाठी त्यांच्या विचारांचे मोठे योगदान आहे आणि त्याचे श्रेय आंबेडकरांना जाते, बाबासाहेबांचे कार्य आणि विचार भावी पिढीपर्यंत पोहोचावा म्हणून डाक विभागाने चैत्यभूमी स्मारक टपाल तिकीट काढले आहे. चैत्यभूमीवर टपाल तिकीट काढणे हा बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव आहे, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.  

डॉ.  आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे डिझाइन ठरविण्यासाठी जागतिक स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यानुसार जगभरातून आलेल्या आराखड्यांचा विचार करूनच स्मारकाची रूपरेषा ठरवली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री चव्हाण यांनी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित आणि उपेक्षितांसाठी आपले आयुष्य वेचले. देशातील दलित, अल्पसंख्याक समाज ग्लोबोलायझेशनच्या, जागतिकीकरणाच्या लाभापासून वंचित आहेत, त्यांच्यापर्यंत हे लाभ पोचणार नाहीत तोपर्यंत देशाचा खरा विकास होणार नाही. त्यामुळे सरकारने व्यावसायिक शिक्षण दलित, अल्पसंख्याक समाजाला देऊन त्याद्वारे रोजगार निर्माण करून द्यावा असे राज्यपाल शंकरनारायणन यांनी सांगितले

यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, महापौर सुनील प्रभू, पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, महिला व बालकल्याण विकासमंत्री वर्षा गायकवाड, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर, मुख्य पोस्ट मास्तर जनरल के. सी. मिश्रा, मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया आदी उपस्थित होते.

ऐतिहासिक दिवस, स्मारकावर पहिले तिकीट 
बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीवर टपाल तिकीट आज अनावरण केले जात आहे आज हा ऐतिहासिक दिवस आहे. आजपर्यंत अनेक व्यक्तीं संस्थावर टपाल तिकिटे काढण्यात आली; मात्र एखाद्या स्मारकावर टपाल तिकीट काढण्याची ही पहिलीच वेळ आहे. देशात लोकशाही बळकट संविधानामुळे झाली आहे याचे सर्व श्रेय बाबासाहेबांना आहे, असे मत सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी व्यक्त केले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad