नवी दिल्ली : आपण नोकरदार नसाल आणि आपल्या खात्यात पन्नास हजार रुपये रोख पडले असल्यास आयकर खात्याची करडी नजर आपल्या खात्यावर पडू शकते. आयकर विभागाने जारी केलेल्या नव्या रिटर्न अर्जात सरकार नोकरदार नसलेल्या व्यक्तींकडील ५0 हजारांपेक्षा अधिक रकमेची चौकशी करू शकणार आहे. तसेच अशा व्यक्तींकडील मोटारगाड्या, विमान, याट बोटी, अशा मालमत्तांचीही कसून चौकशी करणार आहे. त्याचप्रमाणे सोन्याचे दागदागिने, किमती धातू आणि सोन्याच्या लगड्यांचे खरेदी विक्री व्यवहारदेखील आयकर खात्याचे लक्ष वेधून घेणार आहेत. अशाप्रकारे आयकर खात्याच्या नव्या रिटर्न अर्जामध्ये वैयक्तिक मालमत्तेची कसून चौकशी होणार आहे. नोकरी सोडून इतर उत्पन्नाचे स्रोत असलेल्या व्यक्तींसाठी आयटीआर-३ आणि आयटीआर-४ अर्ज भरावयाचे असतात.
कलाप्रेमींनादेखील आता आयकर खात्याच्या चौकशीच्या ससेमिर्याला सामोरे जावे लागणार आहे. त्यांच्याकडील दुर्मिळ कलावस्तू, पेंटिंग, शिल्पाकृती, ऐतिहासिक वस्तू यांचादेखील हिशेब आयकर खात्याला द्यावा लागणार आहे. तसेच आयकर खाते व्यक्तीच्या मालकीची जमीनजुमला, इमारती, ठेवी, विमा आणि शेअर यांचादेखील हिशेब मागणार आहे. थोडक्यात यापुढे आयकर खात्याची नजर सर्व संपत्तीकडे असणार आहे. केवळ त्या वर्षातील उत्पन्नाची आकडेवारी सादर केल्याने आयकर खात्याचे समाधान यापुढे होणार नाही.
No comments:
Post a Comment