वृद्धाचा मृत्यू, १४ जण गुदमरले
मुंबई : गोवंडी येथे सोमवारी पहाटे २४ इंचाची पाइपलाइन फुटल्याने हे पाणी प्रचंड वेगाने तेथील एका इमारतीत घुसल्यामुळे तेथील अनेक घरांची पडझड होऊन झालेल्या दुर्घटनेत एका वृद्धाचा मृत्यू झाला, तर या घटनेत १४ जण बुडून गुदमरले. त्यांना उपचारासाठी शताब्दी तसेच सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गोवंडी पूर्व येथे आनंदनगर पुलाजवळ संजीवनी हौसिंग को-ऑप. सोसायटी ही आठ मजली इमारत आहे. पहाटे साडेचारच्या सुमारास या इमारतीच्या तळमजल्यावरील खोली क्र. ५ मधील जमिनीखालून जाणारी पाण्याची पाइपलाइन अचानक फुटली. त्यामुळे हे पाणी तेथील गटारामध्ये घुसून प्रचंड वेगाने पाण्याचा लोंढा तळमजल्यावरील घरांमध्ये शिरला. या वेळी अनेकजण साखरझोपेत होते. या प्रकारामुळे झोपेतून जाग्या झालेल्या नागरिकांची बाहेर पडण्यासाठी एकच धडपड सुरू झाली, मात्र पाण्याचा वेग मोठय़ा प्रमाणात वाढू लागला. पाण्याच्या प्रचंड दाबाने तेथील अनेक घरांची पडझड झाली. तसेच इमारतीच्या पश्चिमेकडील कंपाऊंडच्या भिंतीचा भाग बाजूच्या बैठय़ा शेडवर पडल्याने शेडची मोडतोड झाली. या घटनेत १५ जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ मदतकार्य हाती घेतले.
पालिकेच्या अपात्कालीन व्यवस्थापन कक्षामार्फत ही घटना पाणी नियंत्रण क क्ष (पूर्व उपनगरे) साहय्यक अभियंता (पाणी खाते) यांना कळविण्यात आली. एम/पश्चिम विभागाच्या पाणी खात्याच्या कर्मचार्यांमार्फत या ठिकाणचा पाणीपुरवठा तात्काळ खंडित करण्यात आला. या घटनेतील जखमींना शताब्दी तसेच सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र देवीसिंग हजारे (६0) या वृद्धाचा त्यापूर्वीच मृत्यू झाला. सूरज साळवे (२३), श्रद्धा जाधव (५), संभाजी भंडारे (४५), सुनंदा भंडारे (४0), प्रशांत भोसले (२५), फैजान खान (१0), नथुराम जाधव (५७), राजू साबळे (२९), कुडचंद (४२), राजू हजारे (३२), सोजूबाई मिसाळ (२४), रोहित मिसाळ (२४), सोपान मिसाळ (६0) व किशोर (२२) अशी या घटनेतील जखमींची नावे आहेत. त्यापैकी साळवे यांचा रक्तदाब वाढल्याने, तर श्रद्धा हिला श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. तसेच अन्य किरकोळ मार लागलेल्यामधील सुनंदा भंडारे यांना डोक्याला मार लागल्याने त्यांना सायन रुग्णालयात पाठवण्यात आले. अन्य ११ जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. या प्रकरणी महापालिका अधिकार्यांमार्फत चौकशी करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment