मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावरील मानखुर्द आणि वाशीच्या दरम्यान सामानाच्या डब्यातील प्रवाशांना लुटणार्या १२ जणांच्या अल्पवयीन मुलांच्या टोळीपैंकी आठ-नऊ जणांना अटक करण्यात आली. त्यांची रवानगी भिवंडी येथील बालसुधारगृहात करण्यात आली आहे. या टोळीतील एका अल्पवयीन मुलाचा मंगळवारीच रेल्वे अपघातात मृत्यू झाला. अटक करण्यात आलेले सर्वजण मानखुर्द येथील लल्लूभाई कंपाऊंड येथे राहणारे आहेत.
सोमवारी रात्री मानखुर्द येथून १२ अल्पवयीन मुले प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी गेली होती. मंगळवारी पहाटे दर्शन करून ही टोळी दादर येथून कुर्ला येथे आली. तेथून हार्बर मार्गावरील पनवेलकडे जाणार्या ट्रेनच्या सामानाच्या डब्यातून चढले. ट्रेनमध्ये चढल्यानंतर या १२ जणांच्या टोळक्याने हुल्लडबाजी करीत सामानाच्या डब्यात बसलेल्या व्यापार्यांना धमकावणे सुरू केले. पहाटेच्या सुमारास फळे व भाजीपाला घेण्यासाठी वाशी बाजारात निघालेल्या या व्यापार्यांना मारहाण करून या टोळीने त्यांच्याजवळील मोबाइल, घड्याळे, तसेच रोकड असा एकूण १५ हजार रुपयांचा ऐवज लुटला. त्यानंतर या टोळीने वाशी रेल्वे स्थानक जवळ येताच ट्रेनची साखळी ओढली असता ट्रेन स्लो होताच सर्वांनी पटापट ट्रेनमधून उड्या टाकण्यास सुरुवात केली. यामध्ये अक्षय शिर्के या मुलाला विरुद्ध दिशेने येणार्या ट्रेनची धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. एका अल्पवयीन मुलास प्रवाशाने पकडून वाशी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी वाशी रेल्वे पोलिसांनी व्यापार्यांच्या तक्रारीवरून १२ जणांच्या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पकडण्यात आलेल्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी ८ जणांना मानखुर्द येथील लल्लूभाई कंपाऊंड येथून अटक करण्यात आली. या अल्पवयीन मुलांकडून पोलिसांनी लुटण्यात आलेले २ मोबाइल, तसेच काही रोकड हस्तगत केली.
No comments:
Post a Comment