मुंबई - शहराला सुशेभीत करण्यासाठी ओसाड पडलेल्या उद्यानांना नवी संजीवनी देण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला होता. प्रत्यक्षात मात्र पालिकेची ही घोषणा नेहमीप्रमाणे पोकळच ठरली असून मोकळ्या मैदानांचा ताबा भिकारी, गुर्दल्ले आणि फेरीवाल्यांनी घेतला आहे. यासाठी आता उद्यानांच्या विकासासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईकरांना विरंगुळ्याचे काहीक्षण मिळण्यासाठी उद्यानांचा विकास करण्याचा निर्णय पालिकेने काही वर्षांपूर्वी घेतला होता. त्यानुसार काही उद्याने नव्याने बनविण्यात आली. मात्र कालांतराने उद्यानाचा विकास रखडला. ओसाड पडलेल्या या उद्यानांचा गैरवापर होत आहे. मुंबईकरांसाठी बनविण्यात आलेल्या या उद्यानांत रात्रीच्या वेळी ओल्या पार्ट्या रंगत असल्याचे आरोप काही नगरसेवकांनी केले आहेत. त्यातच काही उद्यानांत भिकारी आणि गर्दुल्यांनी संसार थाटल्याने उद्यानाच्या परिसरात सर्वसामान्य माणसांचे फिरणेदेखील मुष्कील झाल्याची तक्रार नगरसेवकांकडून होत होती.
अर्थसंकल्पात उद्यानांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद केली जात असली तरी हा निधी पडून असल्याची तक्रार वारंवार केली जात होती. यावर उपाय म्हणून पालिका प्रशासनाने स्वतंत्र उद्यान कक्ष तयार करण्याचा निर्णय घेतला असून प्रमुख अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्याची या कक्षाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात येणार आहे. या कक्षामुळे उद्यानांच्या विकासाला वेग मिळेल, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त असिम गुप्ता यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment