मुंबई - खार गोळीबार नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव देवाशिष चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून चौकशी सुरू असताना तेथे पाडकाम सुरू केल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लाक्षणिक उपोषण केले.
"शिवालिक व्हेंचर्स'तर्फे या ठिकाणी झो.पु. प्रकल्प (एसआरए) राबविण्यात येत आहे, परंतु विविध कारणांमुळे तो वादग्रस्त ठरला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. या वर्षाच्या सुरुवातीलाच मेधा पाटकर यांनी या प्रकल्पासह मुंबईतील विविध झोपु प्रकल्पांतील अनागोंदी आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत झोपडपट्टीवासींचा मोर्चा काढला होता. त्यानंतर आझाद मैदानात धरणे आंदोलन केल्यानंतर गृहनिर्माण प्रधान सचिव चक्रवर्ती यांनी गोळीबार नगर (खार), शीव-कोळीवाडा, इंदिरानगर (जोगेश्वरी-चांदिवली), आंबेडकर नगर (मुलुंड) सह सहा ठिकाणच्या प्रकल्पांची चौकशी करण्याची आणि तोपर्यंत तोडकाम न करण्याची लेखी ग्वाही दिली होती. असे असतानाही गेल्या दोन दिवसांत गोळीबार नगरमधील 43 झोपड्या तोडण्यात आल्या. याशिवाय आणखी काही झोपड्या आज तोडल्या जाणार होत्या; मात्र मेधा पाटकर यांनी उपोषण सुरू केल्याने त्या वाचल्या.
No comments:
Post a Comment