सन २00७ मध्ये जॉन्सन कंपनीला आपल्या बेबी पावडरमध्ये जीवाणूंचे प्रमाण विहित निकषांपेक्षा जास्त असल्याचे लक्षात आले. हे प्रमाण कमी करण्यासाठी त्यांनी एथिलिन ऑक्साईडचा वापर करून निर्जंतुकीकरण प्रक्रिया केली, मात्र निर्जंतुकीकरण केल्यानंतर एथिलिन ऑक्साईडचे प्रमाण त्यात किती राहिले, त्याचा नवजात शिशूंच्या त्वचेवर परिणाम होईल का, हे शोधण्याची चाचणी त्यांनी केली नाही. ही प्रक्रिया कॅन्सरप्रवण असू शकते, जवळपास १५ बॅचेसमध्ये म्हणजे १ लाख ६0 हजार पावडरच्या डब्यांवर ही प्रक्रिया करण्यात आली होती. ही प्रक्रिया वैद्यकीय उपकरणांमध्ये वापरली जाते, मात्र त्यातील डोस किती असावा, याचे प्रमाण ठरलेले असते.
पावडरवर या प्रक्रियेला परवानगी नसल्याने ते प्रमाण निश्चित नव्हते. शिशूंची त्वचा नाजूक असल्याने परिणामांची व्याप्ती मोठी असते, त्यामुळेच औषधे व प्रसाधन कायद्याच्या नियम १४३ (अ) नुसार जॉन्सनच्या सर्व प्रसाधनांचा उत्पादन परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याची कारवाई करण्यात आली, अशी माहिती एफडीएच्या अधिकार्यांनी दिली. विशेष म्हणजे याआधीसुद्धा कंपनीच्या उत्पादनांवर कारवाई करण्यात आली होती; परंतु कंपनीकडून निष्काळजीपणा सुरूच असल्याने ही टोकाची भूमिका घेण्यात आली आहे.
एफडीएच्या कारवाईनुसार २४ जून २0१३ पासून बंदी अंमलात येईल व ९0 दिवसांपर्यंत राज्य सरकारकडे कंपनीला दाद मागता येणार आहे; परंतु त्याचवेळी जॉन्सन कंपनीने यावर खुलासा देताना म्हटले की, निर्जुंतुकीकरण प्रक्रिया केवळ अपवाद म्हणून वापरण्यात आली व ग्राहकांच्या जीवितसुरक्षेशी तडजोड होणार नाही, यासाठी खबरदारी घेतली होती. या बॅचपैकी कशातूनही अनपेक्षित वा इतर दुष्परिणाम झाल्याच्या तक्रारी आल्या नाहीत. दरम्यान, २00७ च्या प्रकरणातील बेबी पावडर आधीच बाजारात विकल्या गेल्या आहेत. त्यामुळे अशा कारवाईला इतका विलंब का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर ग्राहकांमध्ये यामुळे कंपनीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून, काही ग्राहकांनी जॉन्सनचे उत्पादन वापरण्यास बंद केले आहे.
No comments:
Post a Comment