मुंबई : गिरणी कामगारांच्या रिक्षा परवाना आरक्षणाला कामगार नेते शरद राव यांनी केलेला विरोध उदार अंत:करणाने मागे घ्यावा, अशी आग्रणी मागणी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी केली आहे.
जवळपास तीन पिढय़ांच्या गिरणी कामगारांनी आपल्या त्यागमयी कष्टातून या मुंबईला वैभव प्राप्त करून दिले आहे. शासन त्यांच्यासाठी घरकूल योजना राबवीत आहे. बेकार गिरणी कामगारांच्या मुलांना रोजगार मिळावा, यासाठी शासनाने रोजगार केंद्रही स्थापन केले आहे. दारिद्रय़ रेषेखाली नोंद होऊन त्यांना काही फायदेही लागू केलेले आहेत. राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी २0११ मध्ये राज्य शासनाला पत्र पाठवून टॅक्सी-रिक्षा परवान्यामध्ये बेकार गिरणी कामगारांना आरक्षण मिळावे, अशी मागणी केली होती.
त्यानुसार राज्याच्या परिवहन खात्याने अपंग, महिला, माजी सैनिकांबरोबच २0 टक्के गिरणी कामगारांच्या आरक्षणाला रीतसर परवानगी दिली आहे. राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी अधिवेशनात या निर्णयाची बुधवारीच घोषणा करून गिरणी कामगारांना दिलासा दिला आहे. त्याबद्दल राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने गृहमंत्री आर.आर. पाटील आणि परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांचे अभिनंदन केले आहे.
मात्र त्याच वेळी शरद राव यांनी या निर्णयास विरोध केला आहे. टॅक्सी युनियनचे नेते शरद राव यांची गिरणी कामगारांच्या लढय़ाला नेहमीच सहानुभूती राहिली आहे आणि टॅक्सी युनियनच्या लढय़ामागेही गिरणी कामगार राहिले आहेत. तेव्हा कामगार नेते शरद राव यांनी त्यांच्या मुद्याचा पुनर्विचार करून गिरणी कामगार रिक्षा परवाना आरक्षणाला असलेला विरोध मागे घ्यावा, असे आवाहन बजरंग चव्हाण यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment