मुंबई- देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबापुरी चकाचक राहावी यासाठी महापालिका पुन्हा ‘क्लीन अप मार्शल’ तैनात करणार आहे. त्यामुळे यापुढे कोणी रस्त्यावर थुंकले तर त्यांना 500 रुपयांचा भुर्दंड बसू शकतो. मार्शलच्या अरेरावी वागण्यामुळे मागच्या वर्षी पालिकेला ही योजना गुंडाळावी लागली होती.
सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणार्यांना चाप बसावा यासाठी 2007 मध्ये मुंबई पालिकेने ‘क्लीन अप मार्शल’ योजना आणली होती; परंतु मार्शल दंड करण्या ऐवजी तोडीपाणी करत असल्याच्या हजारो तक्रारी आल्या होत्या. नगरसेवकांनीही याबाबत रोष प्रकट केल्याने ही योजना बासनात गेली होती. मात्र, आता नव्या योजनेत अनेक सुधारणा केल्या असून बेशिस्त वर्तणूक करणार्या मार्शलवर कारवाई करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.
विशेष स्पॉटवर मार्शल
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, लघुशंका करणे, कचरा टाकणे, राडारोडा टाकणे यासाठी जागेवरच दंड करण्याची तरतूद आहे. मार्शल योजना चालू असताना पालिकेला प्रतिदिन एक लाख रुपये महसूल मिळत असे. निवृत्त लष्करी कर्मचारी असणार्या कंपनीला या योजनेचे कंत्राट प्राधान्याने दिले जाणार आहे. या मार्शल्सना खास स्पॉटवरती तैनात केले जाणार आहे. दरम्यान, या योजनेवर उच्च् न्यायालयाने आक्षेप नोंदवले असताना प्रशासनाने ही योजना पुन्हा आणल्याबद्दल नगरसेवक आश्चर्य व्यक्त करत आहेत.
No comments:
Post a Comment