स्वयंरोजगारावर आधारीत ‘थ्री इन वन’ पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई: संभाषणात्मक इंग्रजी, व्यक्तिमत्त्व विकास आणि स्वयंरोजगार या विषयांवर गेल्या ४० वर्षांच्या पाहणी आणि अभ्यासानंतर मराठी तरूणांना सर्वप्रकारे प्रगतीचा मार्ग दाखवणाऱ्या हरिश परळकर यांच्या ‘थ्री इन वन’ या पुस्तकाचे प्रकाशन दादरस्थित वीर सावरकर सभागृहात बुधवारी संध्याकाळी झाले. महापौर सुनील प्रभू यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. सदर कार्यक्रमाला आमदार गजानन किर्तीकर, आरझू आणि स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र मेहता, आमदार निलम गोऱ्हे, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी कार्यकारी संचालक रविंद्र साठे, कोकणभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
‘स्पर्धात्मक युग, माहितीचा महापूर आणि नोकरीच्या अनिश्चिततेचा हा काळ आहे. नोकरीवर विसंबून राहण्याचा काळ कधीच मागे पडलाय. गरज आहे ती मराठी तरूणांनी व्यवसायाकडे वळण्याची. पण व्यवसाय म्हटला की भांडवल येते, व्यवसायाचे ज्ञान आवश्यक असते. या सर्व समस्यांवर सर्वोत्तम उपाय म्हणजे हरिश परळकरांचे ‘थ्री इन वन’ हे पुस्तक होय. बिनभांडवली आणि कमी भांडवलात व्यवसाय कसा सुरू करावा याची माहिती या पुस्तकात आहेच परंतू त्याच्याही पुढे व्यावहारीक भाषेतील इंग्रजी ज्ञानाची तहान देखील हे पुस्तक भागविते. खऱ्या अर्थाने व्यावसायाभिमुख आणि ज्ञानाभिमुख असे हे पुस्तक आहे. मुंबईचा प्रथम नागरिक आणि सव्वा कोटी मुंबईकरांच्या वतीने मी या पुस्तकाचे अनावरण करतो’, असे गौरवोद्गार महापौर सुनील प्रभू यांनी पुस्तक प्रकाशनावेळी काढले.
‘सरकारच्या अनास्थेपोटी उद्योजकांचे नुकसान होत आहे आणि उद्योगधंदे महाराष्ट्राच्या बाहेर जात आहेत. मी नेहमीच विधानपरिषदेत विविध प्रश्नांना वाचा फोडत असते. मराठी इंटरनॅशनल क्लबला मी आश्वासन देते की सभागृहात मांडण्याजोगे जे काही प्रश्न असतील ते मी नक्कीच सभागृहात उपस्थित करीन’, असे आश्वासन आमदार निलम गोऱ्हे यांनी कार्यक्रमात दिले.
मराठी इंटरनॅशनल क्लबचे कार्यवाह सतिश रानडे यांच्या सहकार्याने हे पुस्तक प्रकाशित झाले असून स्वयंरोजगार आणि उद्योगधंद्यात आघाडी घेऊन जागतिक स्तरावर एक प्रगतीशील समाज म्हणून वावरावे हा या पुस्तकाचा मुख्य हेतू आहे. मराठी आणि इंग्रजी भाषेत एकत्रित स्वरूपात असलेले हे पुस्तक २१व्या शतकातील भावी पुस्तकांचे प्रतिनिधीत्व करणारे असे आहे. कोणत्याही भांडवलाशिवाय चालू करण्याजोगे ४० व्यवसाय हा या पुस्तकाचा आकर्षबिंदू आहे. या कार्यक्रमाला मराठी इंटरनॅशनल क्लबचे संस्थापक मनोज गोवेकर, युक्ती मीडिया कन्सल्टन्सीचे सीईओ प्रमोद सावंत उपस्थित होते.
No comments:
Post a Comment