आशिया खंडातील सर्वात मोठी महानगर पालिका म्हणून मुंबई महानगर पालिका ओळखली जाते. २७ हजार करोडचा अर्थसंकल्प असलेल्या या महानगर पालिकेमध्ये १ लाख २० हजार कर्मचारी, अधिकारी काम करत असून लोकप्रतिनिधी म्हणून २२७ नगरसेवक या पालिकेमध्ये आहेत. मुंबई महानगर पालिकेच्या कामात अडथळा येवू नये व रोजची नियोजित कामे वेळेवर व्हावीत यासाठी १९३६ साली पालिकेने भायखळा एन.एम. जोशी मार्गावर मुद्रणालय सुरु केले आहे.
पालिकेच्या या मुद्रणालयाची वर्षाला ६० करोड कागदांची छपाई करण्याची क्षमता असून या मुद्रणालयातून पालिकेमध्ये होणाऱ्या सभा, बैठकीचे अजेंडे, विविध कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका, पालिकेची डायरी, दिनदर्शिका , पालिका विचिध कार्यालयाला व रुग्णालयांना लागणारी सर्वच प्रकारची छापील स्टेशनरी, अशा पालिकेच्या २५६ शेडूल्ड गोष्टी, नॉन शेडूल्ड गोष्टीपैकी १०० गोष्टींची छपाई केली जाते.
मुद्रणालयात नवीन मशीन आणल्या जाव्यात यासाठी सन २०१० -११ मध्ये १३.५ कोटी रुपयांचा निधी तर सन २०१२ -१३ मध्ये १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गेल्या ४ वर्षात नवीन मशीन खरेदी करण्यासाठी २८ कोटींचा निधी मिळूनही फक्त ३ मशीन खरेदी करण्यात आल्या आहेत. ३ मशीन खरेदी केल्यावर बाकीचा निधी अद्याप तसाच पडून असला तरी भ्रष्ट अधिकारी मुद्दाम हलगर्जी पणा करत असल्याने मशीन विकत घेण्यासठी असलेला निधी तसाच पडून आहे. यावर्षीही पालिकेने मुद्रणालयासाठी ४० कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
एकीकडे पालिकेचे स्वताचे मुद्रणालय असताना या मुद्रणालयात सर्व सोयी सुविधा असताना निधीची कमतरता नसताना पालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे मुद्रणालयात नवीन मशीन आणल्या जात नाहीत. मुद्रणालयाचे काम कमी करून अर्धे काम पालिकेच्या बाहेरील प्रिंटर कडून केले जात आहे. पालिकेच्या काही अधिकाऱ्यांच्या व खाजगी प्रिंटर यांच्या संगनमताने पालिकेच्या मुद्रणालयाचे काम खाजगी प्रिंटींग प्रेस मधून केले जात आहे. अधिकारी व प्रिंटर यांच्यामध्ये असलेल्या आर्थिक साटेलोट्यामुळे खाजगी प्रिंटर कढून हवी तशी मनाला येईल तशी बिल पालिकेला सादर करून मंजूर केली जात आहेत.
पालिकेचे अधिकारी पालिका मुद्रणालयात काम न देता बाहेरील प्रिंटरला काम देवून वाढीव बिल विविध कारणे देवून कसा भ्रष्टाचार करतात याचा नमुना म्हणून जनसंपर्क विभागाचा भ्रष्टाचार आम्ही जनतेसमोर आणला होता. पालिका मुद्रणालयात चांगले काम होत नाही म्हणून डिझाईनच्या नावाने किवा त्वरित स्टेशनरी प्रिंट करून लागणार अशी करणे देवून खाजगी प्रिंटरकडे काम वळवण्याचे प्रमाण वाढले आहे. पालिकेच्या अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे पालिकेच्या मुद्रणालयात एके काळी ६०० कर्मचारी असताना आज फक्त ३०० कामगार उरलेले असून मुद्रणालयात सध्या अर्धेच काम केले जात आहे.
पालिकेचे स्वताचे मुद्रणालय असताना पालिकेच्या भ्रष्ट अधिकारी व प्रिंटर यांच्यामधील आर्थिक हित संबंधामुळे गेले ३ वर्षे सायन येथील स्मशान भूमीमध्ये मृत व्यक्तींची नोंद जन्म नोंद वहीमध्ये खुले आम केली जात होती. जन्म झालेल्या बाळाचे नाव या रकान्यात मृत व्यक्तीचे नाव नोंदविले जात होते, जन्मतारखेच्या खाली मृत झालेल्या व्यक्तीची तारीख लिहिली जात होती, जन्माचे ठिकाण या रकान्यात मृत व्यक्तीचा पत्ता लिहील जात होता.
सामान्य नागरिकांचे सोडाच पालिकेमध्ये गेले १७ वर्षे सत्ता आहे त्या शिवसेनेचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधना नंतर त्यांच्या मृत्यूची नोंदसुद्धा जन्म नोंद वहीत करण्यात आली. एवढेच नव्हे तर मुस्लिम, ख्रिश्चन धर्मियांना अंत्यविधीसाठी देण्यात येणारे परवानगीचे फॉर्म छापून उपलब्ध होत नसल्याने स्मशानभूमी मधील साध्या कागदावरच परवानगी दिली जायची. याबाबत नगरसेवक विनोद शेलार यांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना ५ फेब्रुवारी व २५ मार्चला पत्र दिले असून विशिष्ट हित संबंध जपण्यासाठी पालिकेच्या मुद्रणालयात काम केले जात नसल्याने मुद्रणालयाच्या कामकाजात लक्ष घालावे अशी मागणी केली आहे.
पालिका आयुक्तांनी हा भ्रष्टाचार वेळीच न थांबवल्यास पालिकेचे मुद्रणालय बंद करण्याची पाळी पालिकेवर आल्या शिवाय राहणार नाही. तरी पालिकेचे मुद्रणालय जिवंत ठेवण्यासाठी प्रिंटींगच्या नावाने केला जाणारा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी पालि केचे प्रमुख म्हणून पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांचे कंबरडे मोडून काढण्याची आवश्यकता आहे.
अजेयकुमार जाधव
09969191363
No comments:
Post a Comment