मुंबई - पालिका रुग्णालयात ड्युटीवर असतानाच खासगी रुग्णालयात प्रॅक्टिस करणार्या डॉक्टरांवर कारवाई करण्याबाबत पालिका विचार करीत आहे. रुग्णालयांतील सर्व वरिष्ठ डॉक्टरांचा कार्यअहवाल सादर करण्याचे निर्देश शीव, नायर व केईएम रुग्णालयांतील अधिष्ठात्यांना देण्यात आले आहेत.
पालिका रुग्णालयात ड्युटी संपल्यानंतर खासगी प्रॅक्टिस करण्यास डॉक्टरांना परवानगी आहे. मात्र केईएम, शीव, नायर या प्रमुख रुग्णालयांतील डॉक्टर आपली ड्युटी संपण्यापूर्वीच मुंबईतील बड्या रुग्णालयांत सेवा देत असल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे आल्या आहेत. विशेषत: हृदयरोग, बालरोग यांसारख्या विभागांचेच डॉक्टर ड्युटीवरून गायब असल्याच्या तक्रारी आहेत. या डॉक्टरांना एक ते दीड लाख रुपये वेतन दिले जाते. मात्र तरीही ते ड्युटीवर असतानाच खासगी रुग्णालयांत प्रॅक्टिससाठी धाव घेतात. अशा वेळी पालिका रुग्णालयातील रुग्णांना योग्य ते उपचार मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णालयांतील अधिष्ठात्यांना डॉक्टरांचा कार्यअहवाल सादर करण्यास सांगितल्याचे अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment