बदलापूर : मी मुंबईत राहत नाही. मुंबई हे राहण्याचे ठिकाण नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. मुंबई कोणाची आहे यावरून खूप वेळा भांडणे होतात. मुंबई कोणाची? कोणाचीही असो पण माझी नक्कीच नाही, अशा शब्दात ख्यातनाम सिनेअभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांनी मुंबईच्या मुद्दय़ावर नामोल्लेख न करता शिवसेना व मनसेला चांगलाच टोला लगावला.
शाश्वत फाऊंडेशनने बदलापूर पश्चिम भागात सुरू केलेल्या सहवास या वृद्धाश्रमाच्या इमारतीचे रविवारी नाना पाटेकर यांच्या हस्ते उद््घाटन करण्यात आले. त्या वेळी बोलताना नानाने वरील मत व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, पुस्तके वाचून अभिनय करता येत नाही. त्यासाठी माणसे वाचावी लागतात. म्हणून मला खेड्यापाड्यात जायला आवडते. मागील पिढीत एकमेकांबद्दल आदर, प्रेम, विश्वास होता; तो आता कुठेतरी कमी व्हायला लागला आहे. माणूस घर, मुले आणि चार भिंतीत स्वत:ला कोंडून घेऊन लागला आहे. शेजारच्या घरात काय होतंय हेसुद्धा कळत नाही, ही समाजाला लागलेली कीड असल्याचे नाना म्हणाले. आयुष्य कापरासारखे असते जळत नसल तरी उडत असते. त्यामुळे आयुष्य नुसतेच उडण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन समाजहिताचे काहीतरी केले पाहिजे, असे आवाहन नानाने केले. शाश्वत फाऊंडेशनच्या सहवास वृद्धाश्रमात वडीलधार्या मंडळींना घरची आठवण येऊ नये, उलट त्यांच्या मुलानाही इथे येऊन राहावे असे वातावरण असावे, अशी अपेक्षा नानाने व्यक्त केली. या वृद्धाश्रमासाठी शक्य ती मदत करणारच; परंतु त्याचबरोबर अधूनमधून इथे येऊन येथील वृद्धांशी मनमोकळ्या गप्पा मारणार असल्याचेही नानाने सांगितले.
No comments:
Post a Comment