डॉ. बाबासाहेब फक्त दलितांचेच नेते नव्हते - डॉ. नरेंद्र जाधव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 April 2013

डॉ. बाबासाहेब फक्त दलितांचेच नेते नव्हते - डॉ. नरेंद्र जाधव


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर दलितांचे नेते असा शिक्का मारला जातो. मात्र ते राष्ट्रीय नेते होते. दलितांचे नेते असा शिक्का मारून त्यांना बंदिस्त होऊ देऊ नका, असे आवाहन केंद्रीय नियोजन आयोग आणि राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने महापालिकेच्या परळ येथील एफ-दक्षिण विभागीय कार्यालयात आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मीळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, डॉ. आंबेडकर केवळ कायदेपंडित नव्हते. ते अर्थतज्ज्ञ होते. अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांची कामगिरी मोठी आहे. त्यांनी राज्यघटना लिहिली. स्त्री स्वातंत्र्यासाठी हिंदू कोड बिल मांडले. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी ‘स्वतंत्र मजूर पक्ष’ स्थापन केला. त्याचबरोबर डॉ. आंबेडकरांनी प्रांतीय राजकारणात योगदान दिले. ‘एम्प्लॉयमेंट एक्सचेंज’चे जाळे उभे केले. दामोदर खोरे योजनेची मांडणी केली. राज्यघटनेच्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांनी देश एकसंध ठेवला.
हिंदू धर्माच्या चौकटीत राहून त्यांनी समाजातील विषमता संपविण्यासाठी प्रयत्न केला. हे करत असताना त्यांनी सर्वाधिक पदव्याही संपादन केल्या. एवढे महान कार्य करणारा आणि सर्वांसाठी झटणार्‍या महामानवाचे विचार अंगीकारले पाहिजेत. आणि आयुष्याला दिशा दिली पाहिजे, असेही मत डॉ. जाधव यांनी व्यक्त केले. 
आई-वडिलांनी मला जन्म दिला असला तरी माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली. आजघडीला बाबासाहेबांवरील भक्तीचे रूपांतर शक्तीत करायचे असेल तर त्यांचे विचार समजावून घेतले पाहिजे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad