..तर बेस्ट कर्मचार्‍यांचा महामेळावा - शरद राव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 April 2013

..तर बेस्ट कर्मचार्‍यांचा महामेळावा - शरद राव

मुंबई : सानुग्रह अनुदानाचा प्रश्न, बसवाहक आणि चालकांचा प्रशासनाकडून होणारा मानसिक छळ याविरोधात बुधवारी बेस्ट वर्कर्स युनियनच्या वतीने आझाद मैदानात भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्व कामगार नेते शरद राव, वर्कर्स युनियनचे अध्यक्ष उदयकुमार यांनी केले. बेस्ट कर्मचार्‍यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही, तर १७ एप्रिल २0१३ रोजी सकाळपासून आझाद मैदान येथे महामेळावा आयोजित करणार असल्याचे राव यांनी सांगितले.

या महामेळाव्यात पालिका कर्मचारीही सहभागी होणार असल्याचे राव यांनी सांगितले. प्रशासनाने कामगारांच्या आर्थिक प्रश्नाबाबत चालढकल चालवली असून आर्थिक स्थिती चांगली असताना त्यांना सानुग्रह अनुदानापासून वंचित ठेवले आहे. महापौरांच्या मध्यस्थीने महाव्यवस्थापकांनी सानुग्रह अनुदानाबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त करून निधी उपलब्ध झाल्यावर सानुग्रह अनुदान देण्याचे कबूल केले होते. बेस्टला पालिकेकडून १६00 कोटी मंजूर झाले असल्याने बेस्ट कामगारांच्या ३00 कोटींच्या थकबाकीमधील किमान पहिल्या टप्प्याचे १00 कोटी द्यावेत, अशी मागणी राव यांनी केली. त्याचबरोबर पालिका कामगारांना दिलेल्या बोनसप्रमाणेच बेस्ट कामगारांनाही बोनस देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली. रजेच्या कारणावरून प्रत्येक डेपोत चालक-वाहकांना चार्जशिट देऊन मानसिक त्रास दिला जात असून हे बंद करावे, अशी मागणी शरद राव यांनी केली आहे. दरम्यान, काही झाले तरी एप्रिलमध्ये बेस्ट कामगारांसाठी अनुदान आणि थकबाकी घेतल्याशिवाय राहणार नाही, असा निर्वाणीचा इशारा शरद राव यांनी दिला असून ज्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड पालिकेने बजेटच्या दोन टक्के रक्कम परिवहन सेवेसाठी देण्याचे ठरवले आहे, तसाच निर्णय मुंबईतही झाला पाहिजे, अशी मागणी राव यांनी केली.
खोब्रागडेंवर निशाणा
उत्तम खोब्रागडे यांनी बेस्टवर ८१ कोटींचे असलेले कर्ज चुकीच्या धोरणांमुळे २ हजार ४00 कोटींवर नेले. नको त्या बसेस विकत घेतल्या. शॉर्ट टर्म लोन ही नवीन पद्धत अवलंबल्याने व्याजापोटी बेस्टला अधिक पैसे खर्च करावे लागले. मात्र त्यातून महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता यांनी बेस्टला बाहेर काढले. त्यांनी कामगारांचे भले केल्यामुळे आम्ही थकबाकीसाठी तगादा लावला नाही. परंतु आता आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याने थकबाकी मिळाली पाहिजे, असेही शरद राव म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad