मुंबई : शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई(उत्तर) विभाग चेंबूर येथील कार्यालयात अनेक महत्त्वाची पदे रिक्त असून यासंदर्भात वारंवार मागणी करूनही जागा न भरल्या गेल्याने शाळा, शिक्षकांच्या कामाला विलंब होत आहे. तसेच कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचार्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे.
उत्तर विभागात एकूण ६ वॉर्ड असून ४ वॉर्डांमध्ये महत्त्वाची शिक्षण निरीक्षकांची पदे रिक्त आहेत. या पदांचा कार्यभार सध्या सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक सांभाळत आहेत. कार्यालयातील १४ कनिष्ठ लिपिकांपैकी ९ लिपिकांच्या जागा रिक्त असून वरिष्ठ लिपिकांच्या २ जागा रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षकांची वैद्यकीय बिले, भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या तसेच भविष्य निर्वाह निधीवरील कर्ज प्रकरणे कधीही वेळेवर मिळत नसल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे संघटनमंत्री अनिल बोरनारे यांनी सांगितले. एक महिन्यानंतर जूनमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असून सर्वशिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तकांचे वाटप, ११ वीची प्रवेश प्रक्रिया, शाळांचा संच मान्यता, वैयक्तिक मान्यता, पुनर्रचित अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत होणारे प्रशिक्षण यांसह अन्य कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तरी या दुष्परिणामांचा विचार करता तातडीने या रिक्त जागा भरण्याची कार्यवाही करावी. अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा शिक्षक परिषदेने दिला आहे.
No comments:
Post a Comment