मुंबई : मुंबई मनपाच्या अजब कारभाराचा उत्तम नमुना पुढे आला आहे. दहिसर येथील गेली २३ वर्ष सुरू असलेली शाळा पालिका प्रशासनाने अनधिकृत ठरवून कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.ऐन परीक्षा काळात मनपाकडून हा निर्णय घेतला गेल्याने चिंतातूर पालकांनी शाळा वाचविण्यासाठी महापौर सुनील प्रभू यांच्याकडे गार्हाणे मांडले आहे. महापौरांनी त्यावर कायदेशीर बाबी तपासून कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन पालकांना दिले आहे.
दहिसर येथील मातृछाया स्कूल ऑफ ज्युनियर कॉलेज आणि डिग्री कॉलेजमध्ये सध्या ३ हजार २00 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याशिवाय १२५ कर्मचारीही कार्यरत आहेत. १९८९ रोजी या गुजराथी शाळेला मान्यता देण्यात आली. त्यानंतर १९९0 मध्ये या ठिकाणी माध्यमिक शाळा सुरू करण्यात आली होती, तर २00२ मध्ये इंग्रजी माध्यमालाही मान्यता देण्यात आली होती. २00५ मध्ये डिग्री कॉलेज सुरू करण्यात आले. अनधिकृत शाळा ठरवणार्या मनपाने २00१ मध्ये या शाळेचा आदर्श शाळा म्हणून गौरव केला होता, असा या शाळेचा इतिहास आहे. पालिका प्रशासनाकडून २३ वर्षांनंतर ही शाळा खेळाच्या व मनोरंजन मैदानाच्या जागेवर उभारण्यात आली असे सांगत शाळेवर कारवाई करण्याचे आदेश दिले गेले आहेत. या मुद्दय़ाबाबत पालकांनी स्थानिक नगरसेविका शीतल म्हात्रे यांची भेट घेत त्यांच्यापुढे समस्या मांडल्या. म्हात्रे यांनी प्रकरणाचे गांभीर्य पाहत महापौरांना सर्व परिस्थितीची जाणीव करून दिली आहे.
No comments:
Post a Comment