कुर्ला येथील बांधकामासाठी पालिका अधिकाऱ्यांनाही लाच - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 April 2013

कुर्ला येथील बांधकामासाठी पालिका अधिकाऱ्यांनाही लाच


मुंबई - कुर्ला नेहरूनगर येथील अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी केवळ पोलिसच नाही तर महापालिकेचे अधिकारीसुद्धा लाच मागण्यासाठी पोचले होते. एम- पश्‍चिम वॉर्डाच्या एका उपअभियंत्याची एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी पूर्ण न केल्यामुळेच हे बांधकाम पाडण्यात आले. महापालिकेचे लाचखोर अधिकारी आणि कर्मचारी या व्हिडीओ रेकार्डिंगमध्ये सापडले नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, महापालिका आयुक्तांनी या प्रकरणी विभागातील सहाय्यक आयुक्तांकडून येत्या सात दिवसांत अहवाल मागविला आहे.

नेहरूनगर परिसरातील ठक्कर बाप्पा कॉलनीत कासम खान याच्या मित्राने केलेल्या अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी लाच घेण्यासाठी येणाऱ्या पोलिसांचे स्टिंग ऑपरेशन कासम आणि त्यांचा मुलगा रिझवान यांनी केले. यावेळी छुप्या कॅमेऱ्यात सापडलेले पस्तीस पोलिस तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनंजय बागायतकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईसोबतच दोषी पोलिसांवर लाचखोरी केल्याप्रकरणी एसीबीमध्ये गुन्हादेखील दाखल करण्यात आला. सध्या या प्रकरणाची खातेअंतर्गत चौकशी सुरू झाली आहे. स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणवणाऱ्या कासन खानने मुंबईतील सर्व रेफ्युजी कॅम्प अधिकृत करण्यात यावेत यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे. कासम खानने केलेल्या स्टिंग ऑपरेशनच्या वेळी तब्बल 45 जणांना लाच दिली. त्यातील दहा जण व्हिडीओ रेकार्डिंगमध्ये सापडले नाहीत. या काळात खान व त्याच्या मुलाने तब्बल पंचेचाळीस हजार हजार रुपये लाच म्हणून वाटले. महापालिकेचा एक उपअभियंता हे बांधकाम कायम राहावे यासाठी एक लाख रुपये मागत होता. त्याला अवघे वीस हजार रुपये दिले. कमी पैसे दिल्याचा राग काढण्यासाठीच त्याने हे बांधकाम 4 एप्रिल रोजी पाडल्याचेही स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पालिकेच्या कर्मचाऱ्यांबाबत तक्रार आलेली नसली तरी सहाय्यक आयुक्त संध्या नाणंदेकर यांच्याकडून अहवाल मागविण्यात आला आहे. येत्या सात दिवसांत हा अहवाल सादर होईल, असे पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी सांगितले.

कासम खानची भूमिका संशयास्पद 
लाचखोरीचे स्टिंग ऑपरेशन करणाऱ्या कासम खानची या प्रकरणातील भूमिकासुद्धा संशयास्पद असल्याचे काही रहिवाशी सांगतात. तीन महिन्यांपूर्वी नझर अली नावाच्या एका व्यापाऱ्याने त्याचे घर बांधायला घेतले होते. नझर अलीला हे बांधकाम करायला परवानगी मिळालीच कशी, अशी माहिती कासमने महापालिका अधिकाऱ्यांकडून मागविली होती. यानंतर महापालिकेने नझर अलीच्या घराचे बांधकाम पाडले होते. कासमने माहिती मागविल्यानंतरच आपल्या घराचे बांधकाम पाडण्यात आल्याचे नझर यांनी "सकाळ' ला सांगितले.

'मित्र चालवितात कासमचे घर' कासम खान गेल्या वर्षभरापासून कोणतेही काम करीत नाही. त्यांचे मित्र घर चालविण्यास वेळोवेळी मदत करतात, असा दावा त्यांचा मोठा मुलगा रिझवान याने केला आहे. पत्नी, पाच मुले असा मोठा परिवार असलेल्या कासमने गेले वर्षभर काहीही काम केले नसेल तर त्याच्या कुटुंबीयांचा चरितार्थ चालतो कसा, त्याचे उत्पन्नाचे स्रोत कोणते, याचा शोध घ्यायला पोलिसांनी सुरुवात केली आहे.

कंत्राटदारच देतात "टीप' कोणत्याही प्रकारे बांधकाम करण्यास परवानगी नसलेल्या या रेफ्युजी कॅम्पमध्ये बांधकाम करण्यासाठी कंत्राटदारांत सुरू असलेली स्पर्धाच पोलिस आणि महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लाचखोरीला कारणीभूत असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. एखाद्या कंत्राटदाराला या कॅम्पमधील घर बांधण्याचे काम मिळाले नाही तर तो प्रतिस्पर्धी कंत्राटदाराची माहिती महापालिकेला पुरवितो. त्यानंतर या बांधकामाच्या ठिकाणी महापालिका व पोलिस अधिकारी व कर्मचारी गिधाडासारखे तुटून पडतात, असेही काही स्थानिकांचे म्हणणे आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad