मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अपेक्षित यश न आल्याने मुंबई काँग्रेसमध्ये मरगळ आली आहे. ही मरगळ दूर करून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईत पक्षाची चांगली तयारी करण्याचे आव्हान चांदुरकर यांच्यासमोर असणार आहे. चांदुरकर हे चांगले वकील आहेत. कृपाशंकर सिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांनी १४ महिन्यांपूर्वी मुंबई प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून रिक्त असलेल्या या जागेवर काँग्रेसमधील अंतर्गत गट-तटामुळे नवीन व्यक्तीची निवड होण्यात अडथळे येत होते. काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी मागील महिन्यात मुंबईला भेट दिली. तेव्हादेखील कार्यकर्त्यांनी काहीशी घोषणाबाजी करत याकडे त्यांचे लक्ष वेधले होते. लवकरात लवकर प्रदेशाध्यक्षपदाची नियुक्ती करण्याचे आश्वासन त्यांनी या वेळी दिल्यापासून नवीन अध्यक्षाबाबत तर्कवितर्क सुरू झाले होते. यामध्ये खासदार एकनाथ गायकवाड आणि माजी सामाजिक न्यायमंत्री आमदार चंद्रकांत हंडोरे यांची नावे आघाडीवर असल्याचे म्हटले जात होते. मधु चव्हाण आणि भाई चव्हाण यांचीही नावे चर्चेत होती. मात्र महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी मोहन प्रकाश यांनी महाराष्ट्रातील नेत्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी दिल्लीला एक अहवाल पाठविला होता. त्यामध्ये चांदुरकर यांना झुकते माप देण्यात आले होते
यासाठी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे तसेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना एकत्र तसेच नंतर वेगवेगळे दिल्लीत बोलावण्यात आले होते. दलितकार्ड चालविण्यासाठी खासदार एकनाथ गायकवाड आणि माजी सामाजिक न्यायमंत्री आमदार चंद्रकांत हंडोरे यांच्यापैकी एकाची घोषणा होण्याचे मध्यंतरी निश्चित मानले जात होते. मात्र पक्षश्रेष्ठींनी चांदुरकरांवर विश्वास व्यक्त केला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीसह शिवसेना आणि मनसेचे आव्हान पाहता मुंबईत काँग्रेसला मजबूत करण्याचे आव्हान चांदुरकर यांच्यासमोर असणार आहे. त्यांच्या सर्वसमावेशक भूमिकेमुळे काँग्रेसपासून दुरावलेले अनेक नेते पुन्हा एकत्र येतील, असा विश्वास काँग्रेसच्या गोटातून व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment