जातीयवादी राजकारण विकासासाठी घातक - राहुल गांधीं - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 April 2013

जातीयवादी राजकारण विकासासाठी घातक - राहुल गांधीं


जातीयवादी राजकारण देशाच्या विकासासाठी घातक असल्याचे सांगतानाच अल्पसंख्याकांना वेगळे केल्यास आर्थिक विकासावर परिणाम होईल, असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. भारतीय उद्योजकांशी संवाद साधताना राहुल गांधींनी एकप्रकारे नाव न घेता गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवर निशाणा साधल्याचे सांगण्यात येते. नवी दिल्लीत आयोजित या कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल यांनी उद्योजकांना धाडसी आणि अधिकार संपन्न भारत निर्माण करण्याचे आवाहन केले.

सीआयआय उद्योग मंडळातर्फे आयोजित चर्चासत्राच्या दुसर्‍या दिवशी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी उपस्थिती लावून उद्योजकांना संबोधित केले. या वेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना देशाचे नेतृत्व कोण करणार? हा प्रश्न कार्यक्रमाला अनुसरून नसल्याचे राहुल म्हणाले. भारत एक विशाल राष्ट्र असून, त्यातील समस्याही किचकट आहेत. त्या सर्व समस्यांचे समाधान करणे आपल्या एकट्याला शक्य होणार नसल्याचे सांगत त्यांनी हा विषय बाजूला सारण्याचा प्रय▪ केला. काँग्रेस उपाध्यक्षांनी कार्यक्रमात उपस्थित प्रमुख उद्योजकांसोबत तासभर चर्चा करून आपले विचार मांडले. 

त्यानंतर कार्यक्रमात दिलेल्या भाषणामध्ये बोलताना, धाडशी आणि अधिकारसंपन्न राष्ट्र निर्माण करण्याचे आवाहन गांधींनी केले. काँग्रेस पक्षाचे सर्मथन करताना, देशातील सर्वच लोकांना एकत्रित घेऊन चालणारा काँग्रेस एकमेव पक्ष असल्याचा दावा राहुल गांधींनी केला. 'विविध समुदायांच्या लोकांना वेगवेगळे करून राजकारण केल्याने लोक आणि विचारांवर निर्बंध लागतात. त्यामुळे अनेक लोक प्रभावित होतात. व्यवसाय प्रभावित होऊन जनतेच्या स्वप्नांवर प्रतिकूल परिणाम होतो. गरीब, अल्पसंख्याक आणि दलितांना वेगळे करणे देशासाठी घातक ठरेल. अर्थव्यवस्थेला वर्षानुवर्षे त्याची नुकसानभरपाई करावी लागेल,' असे राहुल यांनी स्पष्ट केले. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर अल्पसंख्याक व्यापार्‍यांवर भेदभाव करण्याचे आरोप लावले जात आहेत. अशात राहुल गांधींनी नाव न घेता अप्रत्यक्षपणे मोदींवर निशाणा साधल्याचे सांगण्यात येते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad