मुंबई : लोकलच्या महिला डब्यात घुसून महिला प्रवाशांच्या गळय़ातील सोनसाखळी खेचून पळणार्या तरुणाला रेल्वे पोलिसांनी महालक्ष्मी रेल्वे स्थानकातून रंगेहाथ अटक केली. त्याचबरोबर आरोपीकडून चोरीचे दागिने विकत घेणार्या सराफावरही पोलिसांनी कारवाई केली आहे.
सातरस्ता धोबी तलाव येथे राहणारा सुमित सुधीर जावळेकर (१९) हा तरुण इयत्ता ६वीपर्यंत शिकला आहे. आईवडिलांच्या पश्चात त्याचा संभाळ त्याचा भाऊ व आजी करते. लहानपणापासून चरस, गांजाच्या नशेची सवय लागलेला सुमित पैशांसाठी लोकलच्या लेडीज डब्यातील महिला प्रवाशांच्या सोनसाखळय़ा खेचून पळवू लागला. तो वयाने लहान असल्याने लेडीज डब्याच्या दरवाजावर उभे राहून गळय़ात सोनसाखळी अथवा इतर दागिने आहेत, अशा महिला प्रवाशांना हेरत असे. गाडी रेल्वे स्थानकात घुसताच सोनसाखळी खेचून चालत्या लोकलमधून उतरून पळ काढण्याची पद्धत सुमित अवलंबत असे. १८ एप्रिल रोजी त्याने अशाच प्रकारे महालक्ष्मी रेल्वे स्थानकातून एका प्रवासी महिलेची सोनसाखळी खेचून पळताना त्याला रेल्वे पोलिसांनी अटक केली. अशा प्रकारे त्याने ३ गुन्हे केल्याचे उघडकीस आले असून सुमितकडून चोरीचे दागिने विकत घेणार्या जगदीश सोनी या सराफालाही रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.
No comments:
Post a Comment