मुंबईतील बेकायदा इमारतींचे सात दिवसांत सर्वेक्षण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 April 2013

मुंबईतील बेकायदा इमारतींचे सात दिवसांत सर्वेक्षण


मुंबई - शिळफाटा येथील इमारत दुर्घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेने शहरातील बेकायदा बांधकामांचे सर्वेक्षण सुरू केले असून, सात दिवसात ते पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. या सर्वेक्षणानंतर अतिधोकादायक इमारती प्राधान्याने जमीनदोस्त करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून त्यानुसार इमारतींची श्रेणी तयार करण्यात येईल.

मुंबईत झोपड्यांच्या जागी बेकायदा चाळी उभ्या राहिल्या आहेत. लोखंडी खांबावर उभ्या असलेल्या या चाळींत रहिवासी अत्यंत धोकादायक अवस्थेत राहात आहेत; मात्र अद्याप पालिकेने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. शिळफाटा दुर्घटनेनंतर मुंबईतील अशा इमारतींची वर्गवारी करण्याचे आदेश पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी दिले आहेत. अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी यांच्या नेतृत्वाखाली हे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. बेकायदेशीरपणे उभारलेल्या धोकादायक इमारतींना नोटीस पाठवून घरे रिकामी करायला सांगितले जाईल. त्यानंतरही घरे रिकामी न केल्यास पालिका अशा इमारती रिकाम्या करेल, असे अडताणी यांनी सांगितले.

अनेक वेळा बेकायदा बांधकामावर कारवाई करताना सरकार आणि पालिकेत हद्दीचा वाद निर्माण करून सरकारी यंत्रणा एकमेकांकडे बोटे दाखवतात; मात्र यापुढील कारवाईत हा भेदभाव बाळगला जाणार नाही. इमारत धोकादायक असेल आणि ती कोणत्याही यंत्रणेच्या जमिनीवर असली तरी त्यावर कारवाई होईल, असे अडताणी यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad