नेहरूनगर पोलिस ठाण्याचे 36 पोलिस निलंबित - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 April 2013

नेहरूनगर पोलिस ठाण्याचे 36 पोलिस निलंबित

मुंबई - चेंबूर येथील एका खोलीच्या अनधिकृत बांधकामासाठी लाच घेणाऱ्या कुर्ला नेहरूनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकासह 36 पोलिसांवर आज निलंबनाची कारवाई करण्यात आली. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या आदेशानुसार मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी ही कारवाई केली. भ्रष्टाचारासाठी पोलिसांची साखळी कशी काम करते याचे चित्रीकरण एका तरुणाने गेल्या महिन्यात केले होते. ते आज एका वृत्तवाहिनीने दाखविल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या तरुणाने स्टिंग ऑपरेशची सीडी तयार करून, त्याविषयीची तक्रार पोलिस अधिकारी आणि लोकायुक्तांकडेही केली होती. 

गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन, नेहरूनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डी. डी. बागायतकर यांच्यासह 36 जणांना निलंबित केले. जे पोलिस पैसे घेताना दिसत असतील अशा सर्वांची नावे शोधून काढा आणि त्यांना निलंबित करा, असे गृहमंत्र्यांनी आदेशात म्हटले होते. त्यानुसार मुंबईचे पोलिस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी ही कारवाई केली. पोलिस दलात हप्ता व लाचखोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई होते, असा संदेश यातून गृहमंत्र्यांनी दिला आहे. या तरुणाने केलेल्या तक्रारीची ज्यांनी दखल घेतली नाही, त्यांचीही चौकशी करून कारवाई करण्याची सूचना गृहमंत्र्यांनी दिली आहे. या चौकशीचा अहवाल सात दिवसांत सादर करण्याचे आदेश त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत. याशिवाय या प्रकरणाची चौकशी आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फतही होणार असल्याचे समजते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad